Karad News : कराड तालुक्यात ऊसदर घोषणेची शेतकऱ्यांची मागणी तीव्र; कारखान्यांना निवेदन
कराडमध्ये ऊस उत्पादकांचा कारखान्यांविरोधात हल्लाबोल
कराड : कराड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सह्याद्रि, अथणी रयत, जयवंत शुगर, कृष्णा व डायमंड शुगर या कारखान्यांच्या गट ऑफिसवर जाऊन अधिकाऱ्यांना निवेदन दिले. साखर कारखान्यांनी ऊसदर जाहीर करून ऊसतोड करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी कारखान्यांचे कार्यकारी संचालक व अध्यक्ष यांच्यापर्यंत तातडीनेपोहोचवण्यास सांगण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, कराड तालुक्यातील सर्व साखर कारखान्यानी ऊस गळीत हंगाम सुरू केला आहे. मात्र ऊसदर अद्याप जाहीर केलेला नाही.
वास्तविक दर जाहीर न करता ऊस तोडून नेणे हे व्यावहारिकदृष्ट्या योग्य तर नाहीच, उलट हे शेतकऱ्यावर अन्यायकारक आहे. केंद्र शासनाने यावर्षीची एफआरपी १०.२५ साखर उताऱ्याला ३५०० रुपये प्रतिटन निश्चित केली आहे. त्यानुसार कारखान्यांनी प्रतिटन ३७५० रुपये पहिला हप्ता जाहीर करावा. तसेच अंतिम दर चार हजार रुपये देण्यात यावा. दर जाहीर न करताच ऊसतोड सुरुच ठेवल्यास शेतकरी ऊस तोडी बंद करतील.
तसेच ऊस वाहतूक रोखण्यात येईल. यावेळी शिवाजी पाटील, विश्वास कणसे, दत्तात्रय भोसले, वसंतराव देसाई, हिंदुराव पाटील, प्रल्हाद माने, संदीप साळुंखे, प्रशांत पाटील, अॅड. विकास निकम, विनोद पाटील, दिलीप निकम, सत्यजीत पाटील, दीपक पाटील, विक्रम पाटील, संपत गायकवाड, नेताजी पाटील, प्रकाश पाटील व शेतकरी उपस्थित होते.