खानापूर कृषी कार्यालयात शेतकरी दिन साजरा
मेळाव्यात प्रयोगशील शेती-जोडधंद्याविषयी मार्गदर्शन
खानापूर : तालुक्यातील कृषक समाजाच्यावतीने येथील कृषी कार्यालयात शेतकरी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषक समाजाचे अध्यक्ष कोमल जिनगौंड होते. सुरुवातीला विजय कामत, मंजुनाथ उळागड्डी, जोतिबा रेमाणी, बसवराज सानिकोप, रमेश पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कृषी खात्याचे अधिकारी माविनकोप यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने कृषक समाजाच्यावतीने शेतकरी मेळावा घेण्यात आला होता. मेळाव्यात प्रयोगशील शेती आणि शेतीपूरक जोडधंद्याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांचा जमिनीचा पोत जपण्यासाठी रासायनिक खताचा आणि कीटकनाशकांचा कमीतकमी वापर करावा, तसेच नवनवीन बी-बियाणांचा वापर करून उत्पादन वाढवण्यासाठी प्रयोगशील शेतीचे प्रयोग करण्यात यावेत, तसेच शेतकऱ्यांनी आंतरपीक आणि सेंद्रीय शेती करण्यास लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी मऱ्याप्पा पाटील, राचाप्पा सुतगट्टी यासह इतरांची भाषणे झाली.