सुवर्णविधानसौध आवारात विशाल राष्ट्रध्वजाचे अनावरण
बेळगाव : सुवर्णविधानसौधच्या पश्चिम प्रवेशद्वारावर मंगळवारी सकाळी देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या खादी राष्ट्रध्वजाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. चरखा फिरवून मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रध्वजाचे अनावरण केले. महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाला शंभर वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी भल्या मोठ्या राष्ट्रध्वज अनावरणाने वातावरण राष्ट्रभक्तीने भारले गेले. यावेळी राष्ट्रगीत झाले. 75 फूट लांबी व 55 फूट रुंदी असा हा राष्ट्रध्वज आहे.
मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
भल्या मोठ्या राष्ट्रध्वजाची निर्मिती करणाऱ्या विनोदकुमार रेवप्पा बम्मण्णावर यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, सुवर्णविधानसौधच्या प्रवेशद्वारावरील पायऱ्यांवर विशाल राष्ट्रध्वज लावण्यासाठी परिश्रम घेतलेले विधानसभाध्यक्ष यु. टी. खादर व त्यांचे सहकारी, राष्ट्रध्वज तयार करणारे विनोदकुमार व त्यांच्या कुटुंबीयांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. खादी हे केवळ कापड नाही तर ते देशाच्या स्वाभिमानाचा संकेत आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर फरीद, उपसभाध्यक्ष रुद्राप्पा लमाणी, पर्यटनमंत्री एच. के. पाटील, डॉ. एच. सी. महादेवप्पा, लक्ष्मी हेब्बाळकर, राज्याच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश, विधानसभेतील काँग्रेसचे मुख्य प्रतोद अशोक पट्टण, तम्मय्या, सलीम अहमद, नासीर अहमद यांच्यासह अनेक नेते व अधिकारी उपस्थित होते.