भातपिकावर पडलेल्या करपा रोगामुळे शेतकरी चिंताग्रस्त
वार्ताहर/धामणे
हातातोंडाला आलेल्या भात पिकावर करपा रोग पडत असल्याने धामणे, बस्तवाड, हालगा, नंदिहळ्ळी, राजहंसगड, सुळगा (ये.) या भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. यंदा भात पेरणीपासून आतापर्यंत साडेचार महिन्यात या भागात पाऊस भात पिकाला चांगला हंगामशीररित्या पडल्याने या भागातील भातपिक उत्तम आले आहे. आता भातपिक पोसवून भाताचे लोंब भरत असतानाच धामणे, बस्तवाड, हलगा, नंदिहळ्ळी, राजहंसगड, सुळगा (ये.) या भागात शेकडो एकर भात पिकाऊ जमिनीत भातपिक असून आता भात पिकाच्या कापणीला थोडक्याच दिवसांत या भागातील शेतकरी करणार आहेत. परंतु या भात पिकावर जळक्या रोगाचे सावट फिरते आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
कीटकांची झपाट्याने वाढ
करपा रोग म्हणजे भातपिक पोसवत असताना या भात पिकावर बारीक कीटक निर्माण होतात. या कीटकांची झपाट्याने वाढ होते. आज ज्या ठिकाणी दोन फुटाच्या जागेतील भात पिकावर रोगाची लागण झाल्याचे निदर्शनास आले तर दुसऱ्या दिवशी जळजवळ 20 फूट भातपिक ताबडतोब हिरवे असलेले पीक वाळून जात आहे. भातपिक शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आले असतानाच या रोगाची लागण सुरू आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. यंदा दमदार पाऊस झाला असून आतापर्यंत या भागातील पीक चांगले आले असतानाच निसर्गाने या भागातील भातपिकांवर घाला घातल्यामुळे या भागातील सर्वच शेतकरीवर्गातून नुकसान सहन करावे लागत आहे.