For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेतवडीत पावसाचे पाणी साचल्याने शेतकरी चिंताग्रस्त

11:20 AM May 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
शेतवडीत पावसाचे पाणी साचल्याने शेतकरी चिंताग्रस्त
Advertisement

शेती मशागतीची-पेरणीची कामे खोळंबली : पावसाच्या उघडिपीच्या प्रतीक्षेत शेतकरी

Advertisement

वार्ताहर/नंदगड

गेल्या चार दिवसापासून पाऊस सुरू असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. ऐन पेरणीच्या हंगामात शेतवडीत पाणी साचले आहे. त्यामुळे पेरणी कशी करावी, याचीच चिंता खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. खानापूर तालुक्यातील 35 हजार हेक्टर जमिनीत भाताची पेरणी व लागवड केली जाते. जांबोटी, कणकुंबी व शिरोली भागात भाताची रोप लागवड केली जाते. तर खानापूर, नंदगड, गर्लगुंजी, पारिश्वाड, गंदीगवाड, इटगी, चापगाव, बेकवाड, मंग्यानकोप, बिडी, कक्केरी, भुरूनक्की, लिंगनमठ, गोधोळी, हलसी, नागरगाळी, कापोली, गुंजी, लोंढा, रामगुरवाडी भागात भाताची पेरणी केली जाते. मे महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात शेतीची मशागतीची कामे केली जातात. त्यानंतर मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भाताची पेरणी केली जाते. शेती मशागतीसाठी व पेरणीसाठी पावसाची आवश्यकता आहे.

Advertisement

संततधार पाऊस सुरूच

यावर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला तालुक्याच्या काही भागात तुरळक पाऊस झाला. दरम्यान काही गावच्या शेतवडीत शेती मशागतीची कामे करण्यात आली होती. तर बहुतांशी गावातून शेती मशागतीसाठी पावसाची गरज होती. दरम्यान नंदगडमध्ये पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली होती. परंतु गेल्या चार दिवसापासून एकसारखा पाऊस पडत असल्याने शेतवडीत पाणीच पाणी झाले आहे. शेतवडीत ओलावा निर्माण झाल्याने शेती मशागतीची व पेरणीची कामे खोळंबली आहेत. सध्या आठवडाभर पूर्णपणे पाऊस जाणे गरजेचे आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास पेरणी करण्यास अडचण होणार असल्याने शेतकऱ्यांचे लक्ष आता पाऊस कधी जाणार, याकडेच लागले आहे.

Advertisement
Tags :

.