परतीच्या पावसामुळे भातपीक वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत
सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली : पावसाच्या माऱ्याने भातपीक आडवे
बेळगाव : परतीच्या पावसामुळे कापणीला आलेल्या भातपिकाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. चार महिने काबाडकष्ट करून हातातोंडाला आलेले भातपीक सततच्या पावसामुळे वाया जाईल, या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने भातपीक चांगले आले आहे. त्यामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पण सततच्या पावसामुळे काही ठिकाणच्या शिवारातील भातपीक आडवे होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यासह तालुक्यात परतीच्या पावसाने सतत हजेरी लावली आहे. यंदा मान्सूनपूर्व व मान्सून पाऊस समाधानकारकरित्या झाल्याने खरीब हंगामातील पिके तरारून आली आहेत. यापूर्वी शेतकऱ्यांनी बटाटा, रताळी, भुईमूग, सोयाबीन व इतर तत्सम प्रकारची पिके घेतली आहेत तर सध्या केवळ भातपिकाची कापणी शिल्लक आहे. तालुक्यात विशेष करून बासमती, शुभांगी, जया, इंद्रायणी, सोनम, सौभाग्यवती, आमन, साईराम, चिंटूकावेरी, एलपी 125, ओमसाई, कल्याणी, भाऊबली आदी प्रकारची भातपिके घेतली जातात. समाधानकारक पाऊस झाल्याने पिकांची चांगल्याप्रकारे वाढ होऊन पोसवणीही चांगली झाली आहे.
माळरानावर पेरणी करण्यात आलेले दोडगा भात कापणीला आले आहे. त्याचबरोबर शिवारातील भातपीकही पूर्ण प्रमाणात पोसवणी पूर्ण होऊन कापणीला आले आहे. दरवर्षी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून भात कापणीला सुरुवात होत होती. पण यंदा पावसामुळे व्यत्यय निर्माण झाला आहे. पोसवणी होऊन वाळलेले भातपीक वारा पावसामुळे आडवे होत आहे. पडलेल्या भातावर पाऊस झाल्याने गवत काळे पडण्यासह पुन्हा भाताची उगवण होण्याचा धोका अधिक आहे. हातातोंडाला आलेले पीक वाया जाण्याचा संभव असल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लगल्या आहेत. पावसाने उघडीप दिल्यास भात कापणीची धांदल उडणार आहे. मळण्या उरकल्यानंतर शेतकरी रब्बी पिकाच्या पेरणीच्या कामाला लागतो. पण परतीचा पाऊस दररोज बरसल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.