For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भातपीक नुकसानीमुळे शेतकऱ्यांकडून आता ऊस लागवड

10:23 AM Feb 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
भातपीक नुकसानीमुळे शेतकऱ्यांकडून आता ऊस लागवड
Advertisement

भातपिकाला मुसळधार पावसाचा फटका बसल्याने धामणे, देसूर, नंदीहळ्ळी भागातील शेतकरी वर्गाचा निर्णय

Advertisement

वार्ताहर /धामणे

गेल्या पावसाळ्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे धामणे, देसूर, नंदीहळ्ळी भागातील शेतकरी वर्गाला भातपीक व इतर पावसाळी पिकांच्या मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. याचप्रमाणे मागीलवर्षी पाऊस जास्त प्रमाणात झाला आणि पीक ऐन हातातोंडाला आले असतानाच मुसळधार पाऊस होवून सर्व पीक पाण्याखाली येऊन या भागातील शेतकऱ्यांना सर्व पिकांना मुकावे लागले होते. दरवर्षीच्या नुकसानीला सामोरे जाऊन वैतागलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातून आता ऊस लागवड सुरू केल्याचे दिसून येत आहे. पावसाळी पिकांना खर्चाचे प्रमाण जास्त प्रमाणात येते. भात पिकाला शेतात पेरणी करण्यासाठी शेतात मशागत चांगली करून भातपेरणी करतेवेळी रासायनिक खत वापरणे, भातरोपाची वाढ झाल्यानंतर भांगलण करून त्यानंतर पुन्हा रासायनिक खत घातले जाते. हे सर्व करत असताना निसर्गाने म्हणजे पाऊस चांगला होणे गरजेचे असून भातकापणीपर्यंत सर्वच प्रकाराने चांगली साथ राहिली तर भातपीक हातात येवू शकते. परंतू गेले दोन पावसाळे तसे होऊ शकले नाही. मागील वर्षी पाऊस जास्त पडल्याने चांगली झालेली भातपिके पाण्याखाली आल्याने सर्व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आणि शेतकरी हवालदिल झाले होते. त्याचप्रमाणे गेल्या पावसाळ्याच्या पेरणीपासूनच पावसाचे प्रमाण कमी होऊन शेवटी पावसाने दगा दिल्याने पावसाळी सर्वच पिके भात, सोयाबीन, बटाटा, रताळी ही सर्वच पावसाअभावी बाद होवून शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळेच आता उसाची लागवड करणे शेतकऱ्यांनी पसंत केले आहे. कारण उसाची लागवड नव्याने करतेवेळी सद्याच्या परिस्थितीत एकरला 25 ते 30 हजार रुपये खर्च येत आहे. यामध्ये ऊसलागवडीसाठी, जमीन मशागत करण्यासाठी टॅक्टर खर्च, रासायनिक खत आणि उसाच्या बियाणाचा खर्च हा सर्व खर्च 25 ते 30 हजार रुपये प्रती एकरसाठी येत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.

Advertisement

एक एकरला 35 ते 40 टन ऊस उत्पादन

उसाची लागवड करण्यासाठी उसाच्या बियाणाचा एक एकरसाठी 8 ते 10 हजार रुपये खर्च होतो. ही लागवड केल्यानंतर एक एकरला 35 ते 40 टन ऊस उत्पन्न होते. पहिल्या वर्षी उसाच्या लागवडीला खर्चाचे प्रमाण जास्त येते. त्यानंतर 3 ते 4 वर्षे या उसाच्या पिकाचा फायदा होतो. त्यामुळे देसूर, धामणे, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी या भागातील शेतकरी वर्ग आता उसाची लागवड करणे पसंत करत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.