बाळगमट्टीतील पूल वाहून गेल्याने शेतकरी हतबल
शिवाराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल कोसळला : शेतात जायचे कसे याचीची शेतकऱ्यांना चिंता : नवीन पूल बांधण्याची जोरदार मागणी
वार्ताहर /किणये
गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे बाळगमट्टी शिवाराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल कोसळला आणि नाल्यातून येणाऱ्या पाण्यामुळे सदर पूल वाहून गेला. यामुळे आता बाळगमट्टी शिवारात जायचे कसे? याची चिंता या भागातील शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. शिवाराकडे जाणारा एकमेव पूल कोसळल्याने बळीराजा हतबल झाला आहे. तालुक्यात यंदा मुसळधार पाऊस झाला. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. नदी-नाल्यांना पूर आला. अजूनही नदी व नाल्याच्या काठावरील शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. यामध्ये भात व अन्य पिके कुजून गेली आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. बाळगमट्टी शिवाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा महत्त्वाचा पूल होता. डोंगर भागातून येणारे पाणी या पुलावरील नाल्यातून जाते. पावसाने जोर अधिक घेतला होता. यामुळे नाला तुडुंब भरून वाहात होता. या पाण्याच्या प्रवाहामुळे सदर पूल कोसळला व तो वाहून गेला. सध्या या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे.
परिसरातील नागरिकांसाठी रस्ता अत्यंत महत्त्वाचा
बेळगाव-चोर्ला रोड, बामणवाडी क्रॉस जवळील बाळगमट्टी शिवारापासून हा रस्ता शिवाराकडे जातो. रस्ता हुंचेनहट्टी, नावगे रस्त्याला जाऊन पोहोचलेला आहे. त्यामुळे शिवारात जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे. हुंचेनहट्टी-नावगे व बाळगमट्टी भागातील नागरिकांना जांबोटी रस्त्याला व्हीटीयू संतिबस्तवाड या भागात येण्यासाठी हा संपर्क रस्ता म्हणूनही महत्त्वाचा आहे. हुंचेनहट्टी नावगे या भागातील कामगार वर्ग संतिबस्तवाड, बामणवाडी परिसरातील कारखान्यांना ये-जा करण्यासाठी या रस्त्याचा मार्ग अवलंबतात. मात्र सध्या रस्त्यावरील पूल कोसळल्याने शेतकऱ्यांबरोबरच कामगार वर्गाचीही मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे.
लोकप्रतिनिधींनी पुलाची पाहणी करून कामकाज त्वरित करावे
सुमारे 2015 साली रस्त्याचे काम जिल्हा पंचायतीच्या निधीतून झाले होते, अशी माहिती माजी एपीएमसी सदस्य आर. के. पाटील यांनी दिली आहे. सध्या लोकप्रतिनिधींनी या रस्त्यावरील पुलाची पाहणी करून या पुलाचे कामकाज त्वरित करावे, असेही पाटील म्हणाले.
शेतात जाणे झाले मुश्कील
शिवाराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पूल कोसळल्यामुळे शेतात जाणे मुश्कील झाले आहे. डोंगर परिसरातून येणारे पाणी आमच्या शिवाराजवळील नाल्यातून जाते. दरवर्षी या नाल्याला पूर येतो आणि शेतात पाणी साचते. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्र्रमाणात नुकसान होते. तसेच पाण्याबरोबर येणारी मातीही शेतात साचून राहते. पूल कोसळल्याने आता शेतात चालत जाणेही बंद झाले आहे. सदर पुलाचे कामकाज लवकर न झाल्यास आमच्या शिवारातील पुन्हा पिकांचे नुकसान होणार आहे.
- बाळाराम शहापूरकर, शेतकरी-बाळगमट्टी.