For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फळ मार्केटच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्याचे नुकसान

06:01 PM Aug 18, 2025 IST | Radhika Patil
फळ मार्केटच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्याचे नुकसान
Advertisement

 संतप्त शेतकऱ्यांचा रास्तारोको

 सांगली :

Advertisement

फळ मार्केटच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्याच्या लाखमोलाच्या कोथिंबिरीचे मोठे नुकसान झाले. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेत दोन टेम्पो भरून कोथिंबीर मार्केटच्या गेटवर रस्त्यावर फेकत रास्तारोको केला. यावेळी मार्केट कमिटीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

दुष्काळात तेरावा महिना – मार्केट कमिटीचा हलगर्जीपणा

Advertisement

विष्णू अण्णा फळ मार्केट, सांगली येथे सध्या भाजीपाला उघड्यावर, कट्ट्यावर विक्रीस ठेवला जातो. एका भाजीपाला व्यापाऱ्याने मार्केट कमिटीला विनंती केली होती की, सौद्यासाठी बंदिस्त 'सेल हाऊस नंबर एक' वापरू द्या. मात्र कमिटीने ते नाकारले. यामुळे भाजीपाला उघड्यावर ठेवावा लागत आहे.

पावसात कष्टाची कोथिंबीर वाया

सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेली कोथिंबीर अक्षरशः मातीमोल होत आहे. काल लातूर येथून बारा हजार रुपये भाड्याची गाडी करून दोन टेम्पो कोथिंबीर सांगली फळ मार्केटमध्ये आणण्यात आली होती. मात्र मार्केटमध्ये कोणतीही निवारा व्यवस्था नसल्यामुळे पावसाने संपूर्ण कोथिंबीर भिजून खराब झाली.

रागाच्या भरात कोथिंबीर गेटवर फेकून रास्तारोको

यामुळे संतप्त शेतकरी व व्यापाऱ्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला. दोन्ही टेम्पोतील कोथिंबीर मार्केटच्या मुख्य गेटवर रस्त्यावर फेकत जोरदार रास्तारोको करण्यात आला. यावेळी 'मार्केट कमिटी हाय हाय', 'शेतकऱ्यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही' अशा घोषणा देत संताप व्यक्त करण्यात आला.

प्रशासनाचे दुर्लक्ष, घाणीचे साम्राज्य

या साऱ्या प्रकारानंतरही मार्केट कमिटीचे कोणतेही पदाधिकारी घटनास्थळी आले नाहीत, यामुळे शेतकरी व व्यापाऱ्यांचा संताप आणखीनच उफाळून आला. सध्या फळ मार्केटमध्ये स्वच्छतेचा अभाव असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान आणि मार्केटमधील अकार्यक्षमता याबाबत प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.