हत्तीच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
जोयडा तालुक्यातील नानाकेसरोडा जंगलातील घटना
कारवार : म्हशी चरावयाला गेलेली व्यक्ती हत्तीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी जोयडा तालुक्यातील नानाकेसरोडा जवळच्या जंगलात घडली आहे. महेश जानू पाटील (वय 56, रा. नानाकेसरोडा) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, महेश पाटील बुधवारी सकाळी म्हशी चारण्यासाठी नानाकेसरोडा जवळच्या जंगलात गेले होते. पाटील यांच्या सोबत त्यांची पत्नीही होती. त्यावेळी जंगली हत्तीने महेश पाटील यांच्यावर हल्ला केला. हत्तीच्या हल्ल्यात महेश यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तथापी सुदैवाने महेश यांच्या जीवावरील धोका टळला आहे. जखमी महेश यांना स्थानिकांनी उपचारासाठी दांडेली येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच बरचीचे आरएफओ अशोक शिळण्णवर आणि अलूर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष लक्ष्मण जाधव यांनी रुग्णालयाला भेट देऊन जखमी पाटील यांच्या प्रकृतीची चौकशी केली. दरम्यान मनुष्यावर हल्ला करणाऱ्या हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी वन खात्याकडे करण्यात येत आहे. जोयडा तालुक्यातील अनेकजण दररोज जनावरे चारावयाला जंगलात जात असतात. बुधवारी घडलेल्या घटनेमुळे जंगलात जाणाऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.