अस्वलाच्या हल्ल्यात मांगेलीतील शेतकरी गंभीर जखमी
(साटेली भेडशी प्रतिनिधी)
दोडामार्ग तालुक्यातील मांगेली फणसवाडी येथील विष्णू लाडू गवस(४९) या शेतकऱ्यावर मंगळवारी सकाळी रानटी अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केले असून त्यांच्यावर बांबोळी गोवा येथे उपचार सुरू आहेत.मंगळवारी सकाळी विष्णू गवस हे वटपौर्णिमेसाठी आपल्या शेतात फणस आणण्यासाठी गेले असता तिथे फणस खाण्यासाठी आलेल्या अस्वलाने अचानकपणे त्यांच्यावर हल्ला केला. त्यात ते जखमी झाले. अस्वलाच्या तावडीतून सुटण्यासाठी त्यांनी आरडाओरडा केली. मात्र ,अस्वलाने त्यांच्या उजव्या पायाच्या मांडीला चावा घेत,नखांनी ओरबाडून रक्तबंबाळ केले.आणि अस्वल तिथून गेले.
त्याच स्थितीत त्यांनी घर गाठले. गावातील स्थानिकांनी लागलीच त्यांना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. डॉ. अनिकेत गुरव यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबोळी येथे पाठविले. सध्या पावसाचा हंगाम सुरू झाला असून काहीच दिवसात मांगेली येथील धबधबा प्रवाहित होणार असून याचा आनंद लुटण्यासाठी शेकडों पर्यटक मांगेलीत दाखल होतात.अस्वल हल्ल्याच्या घटनेने पर्यटकात भीती निर्माण झाली असून वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.