समडोळी येथील शेतकऱ्याची साडेपाच लाखाची फसवणूक! ऊसतोड मजूर न दिल्याने मुकादमवर गुन्हा दाखल
सांगली ग्रामीण पोलीसांच्याकडून तपास सुरू
सांगली प्रतिनिधी
उसतोडीकरीता मजूर पुरविण्याचे आश्वासन देवून मिरज तालुक्यातील समडोळी येथील एका शेतकऱ्याची 5 लाख 30 हजार ऊपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जगन्नाथ दादू मस्कर ( रा. हायस्कूल रस्ता, समडोळी, ता. मिरज ) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुकादम बबन किसन राठोड (वय 50, रा. वडवणी, कालिफनाथ तांडा, जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन 2014 ते 2015 या कालावधीत हा प्रकार घडला.
घटनेची माहिती अशी, फिर्यादी जगन्नाथ मस्कर यांना 2014- 15 या कालावधीत उसतोडीकरीता मजूरांची आवश्यकता होती. संशयित बबन राठोड याने मजूर पुरविण्याचे आश्वासन देवून जगन्नाथ मस्कर यांच्याकडून 6 लाख रूपये घेतले. पैसे घेतल्यावर संशयित बबन राठोड याने मजूर पुरविले नाहीत. दरम्यान फिर्यादी मस्कर याने वारंवार पाठपुरावा कऊन रक्कमेसंदर्भात विचारणा केली असता संशयिताने सर्व पैसे मजूरांना दिले असल्याचे सांगितले. सन 2015 मध्ये संशयित राठोड याने 70 हजार रूपये फिर्यादी मस्कर यांना परत दिले. मात्र उर्वरित 5 लाख 30 हजार मात्र मागणी करूनही अद्याप दिले नाहीत. त्यामुळे मस्कर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. या प्रकरणांचा तपास सांगली ग्रामीण पोलीस करत आहेत.