For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विद्युतभारित तारेच्या स्पर्शाने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

06:45 AM Aug 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
विद्युतभारित तारेच्या स्पर्शाने  शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
Advertisement

कोनेवाडी येथील शेतवाडीत घडली घटना : पत्नी सुदैवाने बचावली

Advertisement

उचगाव/वार्ताहर

शेतवडीमध्ये काम करत असताना विद्युतभारित तारेच्या स्पर्शाने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि. 10 रोजी दुपारी बाराच्या सुमारास कोनेवाडी येथे घडली. या घटनेमुळे गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

भरमा गंगाराम पावशे राहणार कोनेवाडी असे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते सकाळी शेतावर गेले होते. शेतामध्ये काम करत असताना शेतामध्ये खांबापासून पेटीपर्यंत ओढलेल्या सर्व्हिस वायरचा त्याना स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. उंदराने वायर कुडतरल्यामुळे तारेचा स्पर्श झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

यावेळी त्यांची पत्नी त्या ठिकाणी होती. काही कामगारही काम करत होते. पतीच्या ओरडण्याच्या दिशेने तेथे काम करत असलेली पत्नी धावत गेली. त्यावेळी  विद्युतभारित तारेचा स्पर्श झाल्याने पती ओरडत असल्याचे पाहून त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु पत्नीलाही त्या विद्युतभारित तारेचा स्पर्श झाल्याने त्याही तेथे चिकटून राहिल्या अन् आरडाओरड सुरू केली. हे ऐकूण लागलीच जवळच असलेल्या दुसऱ्या एका महिलेने जवळ असलेले लाकूड घेऊन तिच्या हातावर मारल्याने दोघेही एकमेकापासून वेगळे झाले. त्या घटनेत पत्नी सुदैवाने बचावली. मात्र, पतीचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.

शेतवाडीत बघ्यांची गर्दी

सदर बातमी समजताच आजूबाजूच्या शेतवडीतील लोक त्या ठिकाणी जमा झाले. लागलीच हेस्कॉम खात्याला कळवून विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर  घटनास्थळी उचगाव हेस्कॉम खात्याचे प्रमुख सचिन यांनी जाऊन पंचनामा केला. मृतदेह शवचिकिस्येसाठी जिल्हा ऊग्णालयात पाठवून दिला आहे. पावशे कुटुंबीयांना सरकारकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

Advertisement
Tags :

.