सांगली संस्थानच्या गणरायाला शाही थाटात निरोप! ढोल-ताशा, लेझीमसह टाळ-मृदृंगाच्या तालावर निघाली रथयात्रा
श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांची उपस्थिती: संस्थानच्या गणरायाला निरोप देण्यासाठी सांगलीकरांची अलोट गर्दी
सांगली प्रतिनिधी
अलोट भाविकांची गर्दी... एक दोन तीन चार गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपतीबाप्पा पुढच्यावर्षी लवकर, या अशा घोषणांच्या निनादात सांगली संस्थानच्या गणरायाचे बुधवारी पाचव्या दिवशी परंपरेनुसार शाही थाटात विसर्जन करण्यात आले. यावेळी सांगली संस्थानचे श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन, राजलक्ष्मीराजे पटवर्धन, युवराज अदित्यराजे पटवर्धन, राज्यकन्या पौर्णिमाराजे पटवर्धन, मधुवंतीराजे पटवर्धन यांच्यासह सांगलीतील पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या गणेशाच्या विसर्जनानंतर आतषबाजी करण्यात आली.
सांगली संस्थानच्या श्री गणपती पंचायतन संस्थानतर्फे यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने आा†ण पारंपा†रक व धार्मिक पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. शाही थाटात मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी पाचव्या दिवशी प्रथम श्रीमंत विजयसिंह पटवर्धनराजे आणि श्रीमंत राजलक्ष्मीराजे पटवर्धन, युवराज अदित्यराजे पटवर्धन यांच्याहस्ते गणरायाची आरती करण्यात आली. त्यानंतर संस्थानच्या प्रथेप्रमाणे दरबारातील मान्यवरांना पानसुपारी देण्यात आली. यावेळी गणपती पंचायतन संस्थानचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर दरबार हॉल येथे उपस्थित होते.
त्यानंतर गणरायाची उत्सवमूर्ती सजविलेल्या रथात ठेवण्यात आली. या रथाच्या पुढील बाजूस ढोल-ताशा पथक, टाळ-मृदृंग आणि लेझीम मंडळाचे पथक तसेच मानकरी आणि गणपती पंचायतनचे सर्व सदस्य सहभागी झाले होते. ही शाही मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्याप्रमाणात सांगलीसह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी भाविकांकडून गणरायाचे दर्शन घेण्यासाठी चांगलीच गर्दी झाली होती. तसेच भाविकांची ही गर्दी बाजूला करण्यासाठी पोलीस आणि स्वयंसेवकांना चांगलाच अवघड जात होते. राजवाड्यातील दरबार हॉल येथून ही विसर्जन मिरवणूक निघाल्यानतंर राजवाडा चौक येथे मोठ्याप्रमाणात स्वागत करण्यात आले. त्यानंतर ही मिरवणूक अशीच पटेल चौकातून गणपती पेठेतून गणपती मंदिरात आली. याठिकाणी पूजाअर्चा केल्यानंतर ही मिरवणूक सांगलीच्या सरकारी घाट असणाऱ्या कृष्णामाई घाटावर ही मिरवणूक आल्यानंतर आंबी यांच्या सजविलेल्या आणि विद्युत रोषणाई करण्यात आलेल्या नावेतून ही उत्सवमूर्ती कृष्णेच्या मध्यावर नेण्यात आली. त्यानंतर या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
हे विसर्जन करण्यात आल्यानंतर भाविकांनी गणपती बाप्पा पुढच्यावर्षी लवकर या असा जल्लोष केला. त्यानंतर जोरदार आतषबाजी करण्यात आली. सांगलीतील कृष्णा नदीत यावर्षी मोठ्या प्रमाणात पाणी होते.