लाडक्या बाप्पांना भक्तीभावाने निरोप
शहरात 370 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सहभाग : पारंपरिक वाद्यांच्या साथीने यंदाची मिरवणूक वैशिष्ट्यापूर्ण
बेळगाव : गणरायांच्या आगमनानंतर चैतन्याने सळसळणाऱ्या शहराने मंगळवारी गणरायांना भक्तिभावाने निरोप दिला. सांस्कृतिक ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या बेळगावच्या वैभवशाली श्रीमूर्ती विसर्जन मिरवणुकीला मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली. बाप्पांना निरोप देताना भक्तांचे डोळे पाणावले. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी भावना मनोमन व्यक्त करत त्यांनी बाप्पांना निरोप दिला. शहरात 370 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. यापैकी बहुतेक मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. पारंपरिक वाद्यांच्या साथीने यंदाची मिरवणूक वैशिष्ट्यापूर्ण ठरली. ढोलताशा पथकांच्या वादकांनी आपल्या वादनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विशेष नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे ढोलांवर महिला अत्याचाराला विरोध दर्शविणारे मजकूर लिहिण्यात आले होते. मिरवणूक पाहण्यासाठी प्रशासनाने उभ्या केलेल्या प्रेक्षक गॅलरीमध्ये गर्दी झाली होती. तसेच रस्तेही गर्दीने फुलले होते.
प्रशासनातर्फे विसर्जन मिरवणुकीला दुपारी 4 वा. प्रारंभ होणार असे सांगण्यात आले होते. परंतु यंदा मिरवणुकीला काहीशा उशिराच सुरूवात झाली. विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटगीमठ, आमदार राजू सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, महापौर सरिता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, जि. पं. सीईओ राहुल शिंदे, माजी आमदार अनिल बेनके, महापालिकेच्या अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांच्या उपस्थितीत विसर्जन मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली. सकाळपासून कपिलेश्वर तलाव, जक्कीनहोंड, किल्ला तलाव, अनगोळ, वडगाव, जुने बेळगाव, मजगाव तलाव येथे घरगुती श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर दुपारी 3 वा. सार्वजनिक श्रीमूर्तींच्या विसर्जनाला प्रारंभ झाला. माळी गल्लीच्या कार्यकर्त्यांना दुपारी 3 वाजताच श्रीमूर्तीचे विसर्जन करून सर्वप्रथम विसर्जन करण्याचा मान मिळविला. त्यानंतर संथगतीने अन्य मंडळाच्या मूर्तींचे विसर्जन सुरू झाले.
दरम्यान वाहनांची गर्दी रोखण्यासाठी आणि नागरिकांना सहजपणे श्रीमूर्ती विसर्जन मिरवणूक पाहता यावी, यासाठी पोलीस प्रशासनाने यंदा मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या आडव्या रस्त्यांची बॅरिकेड्स लावून अडवणूक केली. याची कल्पना नसल्याने वाहन धारकांना मात्र लांबचा फेरा पडला. साधारण सातच्या सुमारास दैवज्ञ सेवा संघाची श्रीमूर्ती समादेवी गल्लीच्या कोपऱ्यावर होती. तर दुसरी श्रीमूर्ती हुतात्मा चौकामध्ये होती. यादरम्यान मारूती गल्लीमध्ये एकही मूर्ती दाखल झाली नसल्याने शुकशुकाटच होता. साधारण मंगळवारी रात्री 8.30 नंतर श्रीमूर्ती मिरवणुकीला प्रारंभ झाला.
मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या घरातील श्रीमूर्तींचे विसर्जन प्रथम केले. आणि नंतर सार्वजनिक श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी मंडपात दाखल झाले. त्यामुळे खऱ्या अर्थान रात्री 10 च्या दरम्यानच मिरवणुकीला प्रारंभ झाला. प्रत्येक मंडळाने आपापल्या मूर्ती मिरवणुकीत दाखल केल्याने मिरवणूक पाहण्यासाठीची गर्दीही वाढली. ढोलताशा पथकांचे सादरीकरण पाहण्यासाठी लोक आवर्जून उभे होते. त्यामुळे वादकांनाही प्रोत्साहन मिळाले. याशिवाय करेला, लाठीकाठी, लेझिमचे प्रात्यक्षिकही पहावयास मिळाले.
धर्मवीर संभाजी चौक येथे प्रसारमाध्यमांनी थेट प्रक्षेपणासाठी स्टेज उभे केले होते. ड्रोन कॅमेराही सुरू होता. माध्यमांच्या या स्टेजवर पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आमदार राजू सेठ, काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर, राहुल जारकीहोळी, माजी आमदार अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील, भाजप नेते किरण जाधव यांनी उपस्थिती दर्शविली. याचठिकाणी तऊणाईची पाऊले बेभानपणे थिरकत होती. त्यांना पाहण्यासाठी तरूणाईची गर्दी अधिकच होती. त्यामुळे या परिसराला एखाद्या जत्रेचे स्वरूप आले होते. पहाटेचे पाच वाजत आले तरीही तरूणाईचे थिरकणे सुरूच होते.
वारकऱ्यांचे भजन
टिळकवाडी पहिले रेल्वेगेट जवळील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यापूर्वी वारकऱ्यांना निमंत्रित केले. वारकऱ्यांनी टाळ- मृदंगाच्या साथीने भजन सादर केले आणि प्रथमच कार्यकर्त्यांनी टिळकवाडी परिसरात श्रीमूर्तीसह मिरवणूक काढली. या निमित्ताने नागरीकांनीसुद्धा रस्त्यांची साफसफाई करून रांगोळ्या रेखाटल्या व ठिकठिकाणी मूर्तीचे स्वागत करून वारकऱ्यांचेही आर्शिवाद घेतले.
मारवाडी महिला लेझीम ठरले लक्षवेधी
मंगळवारी विसर्जन मिरवणुकीत एकीकडे डीजेचा दणदणाट सुरू होता. तर दुसरीकडे मात्र पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक सुरू होती. विठ्ठलदेव गल्ली शहापूर येथे मारवाडी महिलांनी लेझीम सादर केले. प्रथमच हलगीच्या तालावर महिलांनी लेझीम सादर केल्यामुळे गणेशभक्तांची गर्दी झाली होती. त्याचबरोबर काही मंडळांनी महाराष्ट्रातील हलगी कलाकारांना निमंत्रण दिले होते. हलगीच्या तालावर बुधवारी सकाळपर्यंत तरुणाई थिरकत होती.
मानाच्या गणपतीसमोर 108 श्रीफळ
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही एम. जी. सुब्रमण्यम कुटुंबीयांकडून 108 श्रीफळ फोडण्यात आले. विसर्जन मिरवणुकीतील पहिल्या मानाच्या संयुक्त महाराष्ट्र चौकातील गणेशमूर्तीसमोर श्रीफळ फोडण्यात आले. त्यामुळे यावर्षी देखील ही पंरपरा सुरू ठेवण्यात आली.
माळी गल्लीला सर्वप्रथम श्रीमूर्ती विसर्जनाचा मान
संयुक्त महाराष्ट्र चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दरवर्षी मंडळाची गणेशमूर्ती सर्वप्रथम मिरवणूक मार्गावर दाखल करते. त्यानंतर विविध मंडळांच्या मूर्ती मिरवणुकीसाठी सहभागी होतात. तर माळी गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मिरवणुकीत सहभागी न होता, दुपारी 3 वा. स्वतंत्र्यपणे विसर्जन करून सर्वप्रथम श्रीमूर्ती विसर्जित करण्याचा मान मिळविला.माळी गल्ली मंडळाने श्रीमूर्ती ठेवलेल्या वाहनांवर ‘मिरवणूक वेळेमध्ये का होत नाही? सार्वजनिक गणेशोत्सव याच्यासाठीच सुरू केला का? मंडळांमध्ये इर्षा वाढली आहे, माझी मूर्ती मोठी की तुझी? बेळगावचा गणेशोत्सव विधायक होणार का? असे प्रश्न गणेशभक्तांना विचारण्यात आले आहेत.
कपिलेश्वर परिसरात बुधवारी सायंकाळी प्रचंड गर्दी रात्री उशिरापर्यंत विसर्जन : वाहतुकीची कोंडी
विसर्जन मिरवणूक लांबल्याने बुधवारी रात्री उशिरापर्यंत गणेशमूर्तींचे विसर्जन सुरूच होते. अनगोळ, बेळगावमधील गणेशमूर्ती एकाचवेळी कपिलेश्वर उड्डाण पूल परिसरात आल्याने नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. ढोल-ताशा तसेच पारंपरिक वाद्यांच्या गजरात विसर्जन केले जात होते. सायंकाळी 6 नंतर शहर तसेच उपनगरांमधील गणेशमूर्ती कपिलेश्वर परिसरात दाखल झाल्या. फटाक्यांच्या आतषबाजी तसेच घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता. मंडळांकडून आपापल्या श्रीमूर्तींना वाद्याच्या माध्यमातून वंदन केले जात होते. हे पाहण्यासाठी एसपीएम रोड, कपिलेश्वर रोड, कपिलेश्वर उड्डण पूल याठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती. यामुळे शनिमंदिर व एसपीएम रोडवर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.
रात्री उशिरापर्यंत टप्प्याटप्प्याने विसर्जन
मंडळांनी आपापल्या गणेशमूर्ती वेळेत मिरवणुकीत न आणल्यामुळे बुधवारी उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते. सायंकाळी 5.30 पर्यंत कपिलेश्वर येथील जुन्या तलावात 45 तर नवीन तलावात 130 गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. त्यानंतर 18 गणेशमूर्तींचे विसर्जन होणे बाकी होते. त्यामुळे या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा लावला होता. रात्री उशिरापर्यंत टप्प्याटप्प्याने विसर्जन केले जात होते.