कारवार जिल्ह्यात बाप्पांना निरोप
कारवार : येथील सार्वजनिक गणेश मंडळांच्या बाप्पांसह ग्रामीण प्रदेशातल गणेश बाप्पांना शनिवारी भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. यावर्षी बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी कारवार तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत होता. तथापि गेल्या 4-5 दिवसांपासून विश्रांती घेतल्याने विघ्नहर्त्याच्या विसर्जनाच्यावेळी कोणताही व्यत्यय आला नाही. बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीच्यावेळी प्रशासनाने डीजेच्या वापरावर बंदी घातली होती. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा अधिक वावर दिसून येत होता. गणपती बाप्पा मोरया, एक-दोन-तीन-चार गणपतीचा जयजयकार आदी घोषवाक्ये सर्वत्र कानावर पडत होती.
फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत होती. कारवार शहरासह ग्रामीण प्रदेशातील बिणगा, सदाशिवगड, अंगडी, मुडगेरी, माजाळी येथील सार्वजनिक श्रींच्या विसर्जन मिरवणुकांना संध्याकाळी 4 ते 5 च्या दरम्यान सुरुवात करण्यात आली. मिवरणुकीच्यावेळी येथील कोडीबाग रस्ता, सविता सर्कल, सुभाष सर्कल, ग्रीन स्ट्रीटवर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सविता सर्कल ते बीलट सर्कल रस्त्यावर मिरवणूक पुढे सरकत असताना भाविक मिळेल त्या ठिकाणी उभे राहून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत होते.
काळी नदीत अन् अरबी समुद्रात विसर्जन
प्रत्येक वर्षी ठरल्याप्रमाणे कोडीबाग येथील सार्वजनिक बाप्पासह अन्य काही बाप्पांचे विसर्जन येथील काळी नदीत करण्यात आले. तर शहरातील मारुती गल्लीतील सार्वजनिक बाप्पासह काही बाप्पांचे विसर्जन अरबी समुद्रात करण्यात आले. येथील रविंद्रनाथ टागोर समुद्रकिनाऱ्यावरील विसर्जन सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी किनाऱ्यावर मोठी गर्दी केली होती. येथील काही बाप्पांचे अलीगद्दा येथे अरबी समुद्रात विसर्जन करण्यात आले. विसर्जनाच्यावेळी अप्रिय घटना टाळण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.