‘बांगला’तील धर्मांधांची भारताला धमकी
ममता बॅनर्जींना बंगाल स्वतंत्र करण्याचे आवाहन : खलिस्तानवाद्यांनाही आवाहन
वृत्तसंस्था / ढाका
बांगलादेशातील शेख हसीना सरकारचे पतन झाल्यानंतर तेथे इस्लामी धर्मांध शक्तींनी वेगाने डोके वर काढण्यास प्रारंभ केला आहे. या देशात स्थापन झालेल्या अंतरिम सरकारने अन्सरुल्लाह बांगला टीम (एबीटी) या अल् कायदाशी संबंधित असणाऱ्या दहशतवादी संघटनेचा नेता जसीमुद्दीन रहमानी याची कारागृहातून सुटका केली आहे. त्याने भारताला उघडपणे धमकाविण्यास प्रारंभ केला आहे.
बांगलादेश हा 18 कोटी मुस्लीमांचा देश आहे. तो सिक्कीम किंवा भूतानसारखा देश नाही. भारताने आमच्याशी खेळ करण्याचा प्रयत्न करू नये. तसे केल्यास भारताला आम्ही धडा शिकवू. चीनशी आमचे चांगले संबंध आहेत. आम्ही चीनला भारतावर हल्ला करुन सिलिगुडी मार्ग बंद करण्यास सांगू. चीनने तसे केल्यानंतर भारताचा ईशान्य भारताशी संबंध तुटेल. नंतर ईशान्य भारतातील सात राज्ये, ज्यांचा उल्लेख ‘सात भगिनी’ असा केला जातो, त्या स्वतंत्र होतील. आम्ही खलिस्तानवाद्यांनाही भारताविरोधात उघड संघर्ष करण्याचे आवाहन करणार आहोत. बांगलादेशप्रमाणेच खलिस्तानही भारतापासून स्वतंत्र होण्याचा क्रांतीचा क्षण आता जवळ आला आहे, असा प्रक्षोभक संदेश त्याने सोशल मिडियावर टाकला आहे.
पाकिस्तानचा समर्थक
रहमानी हा पाकिस्तानचा समर्थक म्हणून ओळखला जातो. आता त्याची कारावासातून सुटका करण्यात आल्याने त्याची जीभही सैल सुटली आहे. त्याने भारतावर दबाव आणण्यास प्रारंभ केला आहे. काश्मीर भारतापासून तोडण्यास साहाय्य करण्याची भाषाही त्याने त्याच्या संदेशात केली आहे. भारताचे तुकडे आम्ही करणार असून या देशाचे नामोनिशाण मिटवू अशी दर्पोक्ती त्याने केली.
भारताचे इस्लामीकरण करणार
आम्ही इस्लामचे पालन करणारे लोक असून इस्लामचा विजय व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहोत. भारताने शेख हसीना यांचे समर्थन करु नये. ते भारताला महाग पडेल. भारत तुटण्याची वेळ आता जवळ आली आहे. तसेच, भारताच्या शाही मशिदीवर इस्लामी विजयाचे झेंडे फडकण्याचीही वेळ आली आहे, अशा शब्दांमध्ये त्याने आपल्या पुढच्या कृतीचे संकेत उघडपणे दिले आहेत.