प्रसिद्ध पॉपगायकाला इराणमध्ये मृत्युदंड
वृत्तसंस्था/ तेहरान
ईशनिंदेच्या आरोप इराणमध्ये प्रसिद्ध गायकाला मृत्युदंड सुनावण्यात आला आहे. याचबरोबर गायकावर अश्लीलता फैलावण्याचाही आरोप होता. गायक दीर्घकाळापासून इराणच्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यांना तुर्कियेच्या पोलिसांनी इराणकडे सोपविले होते.
गायकाचे नाव आमिर हुसैन मगशोदलू असून त्यांना टाटालू नावानेही ओळखले जाते. ते रॅप, पॉप आणि आर अँड बीसाठी अत्यंत लोकप्रिय आहेत. 37 वर्षीय गायक 2018 पासून इस्तंबुलमध्ये वास्तव्यास होता. तर डिसेंबर 2023 मध्ये तुर्कियेच्या पोलिसांनी टाटालू यांना इराणच्या स्वाधीन केले होते. तेव्हापासून ते इराणच्या तुरुंगात कैद आहेत.
ईशनिंदेसमवेत अनेक गुन्ह्dयांकरता मागीलवेळेस सुनावण्यात आलेल्या 5 वर्षांच्या शिक्षेला आव्हान देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने आरोपीकडून नोंदविण्यात आलेला आक्षेप स्वीकारण्यात आला होता. यानंतर खटला पुन्हा चालविण्यात आला आणि यावेळी मृत्युदंडच ठोठावण्यात आला आहे. हा अंतिम निर्णय असून याच्या विरोधातही दाद मागता येणार असल्याचे समजते. यापूर्वी टाटालू यांना अनेक आरोपांप्रकरणी 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. 2015 मध्ये टाटालू यांनी इराणच्या आण्विक कार्यक्रमाच्या समर्थनार्थ एक गाणेही तयार केले होते.