प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हांचे निधन
‘बिहारच्या नाइटिंगेल’ अशी ओळख : शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारच्या नाइटिंगेल आणि देशातील प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा यांचे मंगळवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स ऊग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनावर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. लोकगानासोबतच शारदा सिन्हा यांनी बॉलिवूडमध्येही आपल्या आवाजाची जादू दाखवली होती.
शारदा सिन्हा 2017 पासून मल्टिपल मायलोमा नावाच्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. या आजारामुळे अस्थिमज्जावर परिणाम झाला होता. या आजाराशी त्यांनी दीर्घकाळ संघर्ष केला, पण अखेर वयाच्या 72 व्या वषी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा अंशुमन आणि मुलगी वंदना असा परिवार आहे. त्यांचे पती ब्रजकिशोर सिन्हा यांचे याचवषी ब्र्रेन हॅमरेजने निधन झाले होते.
लोकगायनात अतुलनीय योगदान
शारदा सिन्हा यांनी आपले जीवन बिहारच्या लोकगायनासाठी समर्पित केले. त्यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1952 रोजी बिहारमध्ये झाला. त्यांनी प्रामुख्याने मैथिली आणि भोजपुरी भाषांमध्ये गाणी गायली. ही गाणी बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. छठपूजा, लग्न, सांस्कृतिक सणांना त्यांच्या गाण्यात विशेष स्थान होते. त्यांच्या छठ उत्सवातील गाण्यांनी प्रत्येकाच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केलेले आहे.