पतीकडून पत्नीसह सासरच्या कुटुंबीयांवर विळ्याने हल्ला
बेनकनहळ्ळी येथील घटनेने खळबळ
बेळगाव : पत्नीच्या माहेरी जाऊन पत्नी, मेहुणा व सासऱ्यावर विळ्याने हल्ला करणाऱ्या संशयितांविरोधात बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पती संपत लक्ष्मण निलजकर (रा. मुजावर गल्ली, बेळगाव), कृणाल आणि इतर एकावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, संपत याची पत्नी निकिता ही बाळंतपणासाठी तिच्या माहेरी बेनकनहळ्ळी येथे गेली होती. तिची प्रसुती झाल्यानंतर पती संपत हा वारंवार मला मूल एवढेच दे तू येऊ नकोस, असे तिला सांगत होता.
सोमवारी रात्री संपत, कृणाल व आणखी एक जण त्यांच्या घराकडे गेले. त्याठिकाणी घरातून बाहेर पडा, अशी त्यांच्या घरासमोर जाऊन आरडाओरड केली. मात्र निकिता हिच्या घरच्यांनी दरवाजा काढला नाही. त्यामुळे त्यांच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. याचबरोबर दरवाजावर लाथा-बुक्क्या मारल्या. त्यामुळे घरात असलेली त्याची पत्नी निकिता, सुरज व सासरा परशुराम बाहेर आले. त्यावेळी त्यांच्यावर विळ्याने हल्ला केला. यामध्ये हे सर्व जखमी झाले आहेत. या घटनेनंतर निकिताची आई लक्ष्मी परशुराम फडके यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकामध्ये फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी संपत, कृणाल व आणखी एकावर बीएनएस कायदा 333 (1), 109 (1), 118 (1), 352, 351 (2), 351 (3), 324 (4), 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.