महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उद्योग-व्यवसायातील कौटुंबिक व्यवस्थापन

06:07 AM Sep 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कुटुंबाद्वारा व कौटुंबिक स्तरावर चालवण्यात येणारे उद्योग-व्यवसाय हे भारतीय उद्योग आणि अर्थव्यवस्थेचे मुख्य व प्रमुख वैशिष्ट्या होय. देशांतर्गत विविध कुटुंबाद्वारा परंपरागत स्वरूपात व पिढ्यानपिढ्या आपापल्या उद्योगांचे संचालन-व्यवस्थापन केले जाते व त्यापैकी अधिकांश उद्योग यशस्वीपणे चालवले जातात. बदलते औद्योगिक वातावरण व व्यवस्थापन कार्यपद्धतीच्या पार्श्वभूमीवर कौटुंबिक उद्योगांच्या व्यवस्थापनातील नव्या पिढीचे स्थान आणि त्यांचे कार्यकर्तृत्व यांचा पडताळा घेणे उपयुक्त ठरते.

Advertisement

कौटुंबिक स्तरावर वा कुटुंब स्तरावर उद्योग व्यवसायांच्या संदर्भात प्रामुख्याने असे सांगितले जाते की या क्षेत्राची सर्वात मोठी व जमेची बाजू म्हणजे त्यांच्या कुटुंबात उपलब्ध असलेली व प्रशिक्षित अशी नवी पिढी याच नव्या पिढीतून या व्यवसायांची व्यवस्थापक आणि व्यवस्थापनाची पिढी सातत्याने तयार होत आली आहे. जागतिक स्तरावर भारतातील या कुटुंबांतर्गत असणाऱ्या व्यवस्थापनाची नोंद घेण्यात आली आहे.

Advertisement

कुटुंब स्तरावर असणाऱ्या या विशेष व्यवस्थापन पद्धतीचे प्रमुख वैशिष्ट्या म्हणजे कुटुंबातील युवा व नव्या पिढीला आपला व्यवसाय व व्यवस्थापनाचे धडे घरच्या घरी व ज्येष्ठांचा सल्ला आणि मार्गदर्शनासह मिळत असतात. त्याचसोबत त्यांना व्यवसाय प्रक्रिया, कार्यपद्धती, निर्णय पद्धती, आर्थिक व्यवहार, धोरणात्मक पद्धती इत्यादीचे मूलभूत धडे विद्यार्थी दशेतच गिरवता येतात. याचा फायदा कौटुंबिक व्यवस्थापन पद्धतीत नवी पिढी व नवा व्यवसाय अशा प्रकारे होत असतो.

कुटुंब स्तरावर घरातील पुढच्या पिढीकडे उद्योग-व्यवसायाची सूत्रे सोपवताना काही बाबतीत अधिक काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक असते. या विचारपूर्वक व नियोजनपूर्ण आखणीतूनच नव्या पिढीतील व नव्या स्वरूपाचे व्यवस्थापक-व्यवस्थापन या उद्योगांना लाभत असते. या संदर्भात पुढील मुद्दे अधिक विचारणीय ठरतात.

उद्योग-व्यवसायाला कुटुंबातील व्यवस्थापकांची कितपत आवश्यकता आहे?

बदलता काळ आणि परिस्थितीनुरुप व्यावसायिक बदल होत असतात. त्याचवेळी घरच्या व्यावसायिक पार्श्वभूमीसह नवी पिढी तयार होत असते. व्यवसाय आणि व्यक्ती यांच्यामध्ये असणारे नवेपण व बदल हे परस्परपूरक कसे होऊ शकतील व त्याचा परस्परांना कसा फायदा होऊ शकेल हे पाहणे महत्त्वाचे ठरते. याच संदर्भातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संबंधित उद्योग-व्यवसायाच्या प्रचलित गरजांनुसार व्यवसाय आणि व्यक्ती यांची यथोचित सांगड कशी घालता येईल? प्रस्थापित उद्योग-व्यवस्थापन व काळानुरूप त्यांच्या असणाऱ्या गरजांची पूर्तता कौटुंबिक स्तरावरील व्यवस्थापकांद्वारा करणे फायद्याचे व जोखमीचे ठरते. याचे नेमके भान ठेवून योग्य ती पावले वेळेत उचलण्यावरच कौटुंबिक व्यवस्थापन पद्धतीचे यश खऱ्या अर्थाने अवलंबून असते.

कुटुंबातील नव्या पिढीची प्रवेश प्रक्रिया

घरच्या व कुटुंबातील उद्योग-व्यवसायातील व्यवसायात घरातील नव्या पिढीला सामावून घेणे व त्यांना औपचारिकरित्या नवीन जबाबदारी सोपवण्यासाठी विशेष पद्धत नसली तरी या त्यासाठी आवश्यक अशा प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक असते. त्यामुळे व्यवसायामध्ये घरच्या नव्या पिढीला सम्मिलीत करताना कुटुंबातील अशा सदस्याची व्यवसायाशी संबंधित आवड-निवड पाहणे महत्त्वाचे ठरते. व्यवसायाच्या प्रचलित वा वाढत्या गरजा आणि त्यानुरूप कुटुंबातील नव्या सदस्याची योग्यता आणि कल यांचा मेळ घालणे यावरच अशा घरगुती स्वरूपाच्या प्रयत्नांचे यश अवलंबून असते.

कुटुंबातील सदस्याचा व्यवसाय प्रवेश आणि प्रक्रिया

उद्योग व्यवसायाच्या पद्धती आणि कार्यपद्धतीच्या साच्यामध्ये कुटुंबातल्या नव्या व युवा घटकाला सामावून घेण्यासाठी विशिष्ट पद्धतीचा अवलंब करणे फायद्याचे ठरते. ही पद्धत निर्धारित स्वरूपात नसली तरी ठराविक स्वरूपात असणे फायद्याचे ठरते.

काही व्यावसायिक व उद्योजक कुटुंबांमध्ये आपल्या उद्योग-व्यवसायाची सूत्र नव्या पिढीकडे सोपवण्यासाठी ठरवून व योजनापूर्वक प्रयत्न केले जातात. ही प्रक्रिया प्रसंगी वर्ष दोन वर्षापर्यंतसुद्धा चालते. यामध्ये कुटुंबांतर्गत जुन्यांचा अनुभव व नव्यांचे माहिती आणि ज्ञान यांची नेमकी देवाण-घेवाण होते व त्याचा फायदा कौटुंबिक उद्योगांना नव्या पिढीच्या माध्यमातून नवे व्यवस्थापन मिळण्याच्या दृष्टीने होतो.

कौटुंबिक व्यवसायाला पूरक मानसिकता

नव्याने उद्योग-व्यवसायाची सुरुवात करताना शिक्षण व ज्ञान-तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे कुटुंबांतर्गत उद्योग-व्यवसायाचे व्यवस्थापन-संचालन करण्यासाठी ज्ञान-तंत्रज्ञान व व्यवस्थापनाच्या जोडीलाच आवश्यकता असते ती विशिष्ट व्यवस्थापकीय मानसिकतेची. या मूलभूत व महत्त्वाच्या बाबी नव्याने कुटुंबाचा उद्योगसांभाळणाऱ्यांकडे असल्या तर त्याचा त्यांना आपल्या उद्योजक-व्यवस्थापक म्हणून कारकीर्द सुरू करताना नव्हे तर पुढील कामकाज आणि कारकीर्दीसाठी आवश्य होत जातो.

कुटुंबातील नव्याने सामील झालेल्या सदस्याकडे उद्योग-व्यवसायाशी निगडित व संबंधित मानसिकतेमध्ये मुख्यत: उद्योग प्रक्रिया विषयक मूलभूत ज्ञान, शैक्षणिक पात्रतेला व्यवसाय-व्यवहार विषयक प्रत्यक्ष सराव, स्वत:चे प्रयत्न, प्रयोगशीलता, निर्णयक्षमता, संवादकुशलता, नेतृत्वशैली, नवे शिकण्याची जिद्द, सकारात्मकता, परस्पर संबंध, समूह व्यवस्थापन, संवेदनशीलता यासारख्या मुद्यांचा प्रामुख्याने समावेश करता येईल.

नव्यातून प्रस्थापित नेतृत्व

वरील प्रमाणे पात्रता व मानसिकता या उभयतांसह असणाऱ्या सदस्यांच्या उद्योग -व्यवस्थापनाच्या संदर्भातील कारकीर्दीचे व्यवसायाच्या सुरुवातीचे व त्यानंतर प्रस्थापित स्वरूपातील नेतृत्व असे दोन टप्पे प्रामुख्याने पार पाडता येतील. हे दोन्ही टप्पे कौटुंबिक उद्योग व त्यामध्ये नव्याने समाविष्ट होणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरतात. यासंदर्भातील जबाबदारी नवागतांप्रमाणेच कौटुंबिक उद्योग-व्यवसायातील प्रस्थापितांची असते हे या संदर्भात उल्लेखनीय आहे.

वाट आणि वाटचाल

कुटुंबातील उद्योग-व्यवसायाची वाट सहज भासत असली तरी ती सहज-सुलभ असतेच असे नाही. घरच्या उद्योग-व्यवसायाला सद्यस्थिती वा सद्यस्वरूप देण्यासाठी आधींच्या पिढी वा पिढ्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम आणि प्रयत्न कारणीभूत असतात, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे कौटुंबिक उद्योगातील प्रस्थापित व्यवस्थापनाने कुटुंबातील नव्या सदस्याला वाट दाखवणे व नवागतांनी त्यानुसार वाटचाल करणे असा प्रयत्नशील योग ज्या ठिकाणी घडून येतो ते कौटुंबिक उद्योग व उद्योजक दोन्ही आपापल्यापरीने यशस्वी होतात.

- दत्तात्रय आंबुलकर

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social_media
Next Article