कुटुंबासमवेत राहता येणारे तुरुंग
शिक्षेच्या नावावर होते क्रूर चेष्टा
तुरुंगात गुन्हेगारांना कठोर शिक्षा दिली जाते असा सर्वसाधारण समज असतो. तुरुंगात गुन्हेगारांना फारसा सुविधा मिळत नाहीत. परंतु जगात काही असे तुरुंग आहेत, जेथे अत्यंत क्रूर गुन्हा करूनही गुन्हेगारांना आरामात राहता येते.
सेबू जेल
फिलिपाईन्समधील सेबू जेल एखाद्या डिस्कोपेक्षा कमी नाही. येथे येणारे कैदी कधीच वैतागत नाहीत. कारण या तुरुंगात त्यांच्या मनोरंजनाची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. संगीत आणि नृत्य दोन्ही एखाद्या औषधाप्रमाणे काम करतात, जे गुन्हेगारांना त्यांच्या जुन्या जीवनापासून मुक्ती मिळवून देण्यास मदत करत असल्याचे फिलिपाईन्सचे प्रशासन आणि लोकांचे मानणे आहे.
जस्टिस सेंटर लियोबेन
जस्टिस सेंटर लियोबेन एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारखे आहे. ऑस्ट्रियातील हे तुरुंगा पूर्णपणे काचेने झाकलेले आहे. या तुरुंगात कैद्यांसाठी खासगी आलिशान खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. यात जिमपासून स्पोर्ट्स सेंटरची देखील सुविधा उपलब्ध आहे. हा तुरुंग 2004 मध्ये निर्माण करण्यात आला होता. यातील कैद्यांचे जीवन ऐषोरामी आहे. या तुरुंगात कैद्यांसाठी टीव्हीपासून फ्रीजपर्यंत सर्व आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.
सॅन पेड्रो जेल
बोलिवियाच्या सॅन पेड्रो तुरुंगाविषयी अनेक जणांना माहिती असावी. बोलिवियाच्या सॅन पेड्रोमध्ये राहणाऱ्या कैद्यांना स्वत:ची खोली खरेदी करावी लागते. या तुरुंगात सुमारे 1500 कैदी आहेत. या तुरुंगातील वातावरण शहरातील गल्ल्यांप्रमाणे आहे. या तुरुंगात बाजारपेठ आणि फूड स्टॉलची देखील सुविधा उपलब्ध आहे.
सार्क जेल
इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यादरम्यान एक छोटेसे गुवेर्नसी नावाचे बेट आहे. येथे जगातील सर्वात छोटे सार्क जेल आहे. हा तुरुंग 1856 मध्ये निर्माण करण्यात आला होता, यात केवळ दोन कैदीच सामावू शकतात. या तुरुंगात कैद्यांना केवळ एका रात्रीपुरती शिक्षा देण्यात येते. परंतु कैद्यांनी मोठा गोंधळ घातल्यास त्यांना येथून अन्य मोठ्या तुरुंगांमध्ये हलविण्यात येते. हा तुरुंग पाहण्यासाठी देशविदेशातून लोक येत असतात.
अरनजुएल जेल
स्पेनमधील अरनजुएल तुरुंग जगातील सर्वात अनोखा तुरुंग आहे. येथे कैद्यांना स्वत:च्या कुटुंबासमवेत राहण्याची सूट आहे. तुरुंगांमध्ये छोट्या मुलांसाठी भिंतीवर कार्टून्स रेखाटण्यात आले आहेत. तसेच येथे शाळा आणि क्रीडामैदानाचीही सुविधा आहे. मुलांना स्वत:च्या आईवडिलांसोबत राहता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. येथे 32 कोठड्यांमध्ये कैदी स्वत:च्या कुटुंबीयांसमवेत राहू शकतात.