कुटुंब प्रथम...
अलीकडच्या काही महिन्यांमध्ये कामाच्या जादा ताणातून अनेकांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. यावरून कर्मचाऱ्यांनी नोकरी करताना काम आणि आपले दैनंदिन जीवन याचा योग्य तो समतोल राखायला हवा हे स्पष्ट झाले होते. इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी जास्तीत जास्त काम करायला हवे, अशा प्रकारचे वक्तव्य करत दररोज 14 तास काम तरुणांनी करायला हवे, असे म्हटले होते. नारायण मूर्ती यांनी आठवड्याला 70 तास काम करायला हवे असे म्हटले होते तर अलीकडेच लार्सन टुब्रोचे चेअरमन सुब्रम्हण्यम यांनी आठवड्याला 90 तास करायला हवे असे वक्तव्य केल्याने पुन्हा अनेकांनी याबाबत आक्षेप व्यक्त केला. यावर संपूर्ण भारतभरातून विविध तज्ञांनी आक्षेप घेतला होता. मध्यंतरीच्या कालावधीत कामाच्या ताणातून इवाय कंपनीतील तरुणीने आत्महत्या केली होती. यातील बऱ्याचशा घटना या मागच्या वर्षी घडलेल्या आहेत. नव्या वर्षाला सुरुवात झाली असून भारतातील कर्मचाऱ्यांनी कुटुंब आधी आणि नोकरी नंतर हा पवित्रा यंदा घेतला आहे, असे एका सर्व्हेक्षणात दिसून आले आहे. नव्या वर्षामध्ये प्रवेश करताना नोकरी तर करायची आहेच पण सर्वाधिक महत्त्व हे कुटुंबाकडे लक्ष देण्यास प्राधान्य असेल, असे अनेकांनी मत नोंदवलं आहे. 78 टक्के लोकांपैकी 5 पैकी 4 जण कुटुंबाला आधी प्राधान्य देण्यासाठी पुढाकार घेणार आहेत. पत्नी, मुले, पालक यांच्याकडे लक्ष देण्यासोबतच नोकरी करणे यांना इष्ट वाटते आहे. काम आणि दैनंदिन जीवन यांच्यातला ताळमेळ उत्तम राखला जाण्यासाठी यंदा अनेकजण भर देणार आहेत. चांगल्या वेतनाची नोकरी शोधताना कमी तणाव राहिल ही बाब नव्याने कामावर रुजू होणारे कर्मचारी आवश्य पाहणार आहेत. त्याचप्रमाणे आपली मानसिक स्थिती नियंत्रणात ठेवत नोकरी करण्याचे नियोजन अनेकांनी केल्याचे पाहणीत स्पष्ट झालेय. वेतन चांगले मिळत असले तरी कुटुंबांकडे लक्ष देण्यासाठी व वैयक्तिक आवडी निवडी सांभाळण्यासाठीही पुरेसा वेळ देण्याचे कर्मचाऱ्यांनी ठरविले आहे. 27 टक्क्यांपैकी चार जणांमधील एक जण त्यांच्या वेतनामध्ये वाढीची अपेक्षा करून आहेत. महागाईच्या तुलनेमध्ये मिळणाऱ्या वेतनामध्ये सर्व काही सोपस्कर पार पाडणे आजच्या घडीला नोकरी करणाऱ्या उमेदवारांना अवघड जाताना दिसते आहे. महागाई दर आणि त्यासोबत मिळणारी पगार वाढ यांचा ताळमेळ बसताना दिसत नाही. मुंबई आणि दिल्लीसारख्या ठिकाणी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना या समस्येचा सामना गंभीरतेने करावा लागतो आहे. हा ताळमेळ साधण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रसंगी अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यासाठी आणखी काही तरी उद्योग करण्याशिवाय पर्याय नसतो. यातील 41 टक्के हे अशाप्रकारे अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याच्या कार्यामध्ये कार्यरत असल्याचे सर्व्हेक्षणात नोंदलं गेलंय. अनेक कर्मचाऱ्यांना वेतनात वाढीची अपेक्षा असली तरी नवे नेतृत्व घेण्यासंदर्भात मात्र त्यांच्यात उदासिनता दिसून आली आहे. नवे नेतृत्व स्वीकारायचे नसेल तर कंपन्यासुद्धा वेतन वाढ करताना विचार करत असतात. परिणामी जरी वेतन वाढ झाली तरी अपेक्षेएवढी होत नाही, हे विसरुन चालणार नाही. कर्मचाऱ्यांनी हा अॅटीट्यूट यंदा बदलायला हवा. कारण नेतृत्व करणाऱ्यांनाच वेतनही अपेक्षित वाढीच मिळतं आणि संधीही पुरेशा भविष्यात उपलब्ध होत असतात. स्थिरता, उत्तम वेतन आणि चांगले फायदे या तीन गोष्टी कर्मचाऱ्यांना यंदा महत्त्वाच्या वाटत आहेत. गेल्या काही महिन्यातील कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांचा परिणाम सद्यकाळामध्ये अनेकांवर पहायला मिळतो आहे. नव्याने रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांनीसुद्धा ही बाब यंदा गंभीरपणे घेतली आहे. त्यांना नोकरी आणि जीवनशैली याबाबतीत कोणत्याही प्रकारची तडजोड करायची नाही आहे. योग्य वेतन मिळावे, नोकरीत सुरक्षितता असावी, त्याचप्रमाणे इतर फायदेही मिळावेत हा दृष्टिकोन अनेक कर्मचाऱ्यांचा पहायला मिळतोय.
कंपन्यांनीसुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांचा विचार करून त्यांना त्यांचे काम आणि जीवनशैली यासंदर्भातला ताळमेळ साध्य करण्यासाठी सहकार्य करण्यासाठी हात पुढे करायला हवा. आजच्या युगामध्ये तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये विविध क्षेत्रे, उद्योगांमध्ये पहायला मिळत आहे. नव्या तंत्रज्ञानाने नोकऱ्या कमी होणार हा समज खोटा आहे. नोकरी शोधू इच्छिणाऱ्यांसाठी यंदा संधी अमाप असतील. जवळपास 55 टक्के जणांना विविध क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी अमाप असतील असे वाटते आहे. पण कर्मचाऱ्यांनीसुद्धा आहे तेच काम करण्यापेक्षा नवनवे कौशल्य आत्मसात करणे जरुरीचे असणार आहे. नवीन तंत्रज्ञान आले तरी त्याकडे पाठ न करता ते शिकून नव्याने अधिक कुशल होण्याकडे कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यायला हवे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होणाऱ्या कंपन्या, संस्थांमध्ये यंदा नोकरीचे प्रमाण अधिक दिसून येणार आहे. याशी संबंधीत डाटा केंद्रे, मशिन लर्निंग आणि कोडिंग यासारख्या तंत्रज्ञान युक्त क्षेत्रामध्ये नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. यंदा कर्मचारी नियुक्ती होताना कौशल्य असणाऱ्या उमेदवारांना प्रथम निवडीत प्राधान्य असेल हेही लक्षात ठेवावे. पारंपरिक पदवीप्राप्त उमेदवारांनी ही बाब विशेष करून लक्षात ठेवावी लागणार आहे. पदवीनंतर इतर कौशल्ये आणि प्रशिक्षणसारखे उपक्रम शिकणे गरजेचे असणार आहे. यंदा एक मात्र खरं की कर्मचाऱ्यांनी कुटुंब प्रथम ठरवलं आहे.
-दीपक कश्यप