कुटुंब चतुर्थी उत्सवात दंग, चोरट्यांनी मारला डल्ला !
सुमारे 4.80 लाखांचा ऐवज लंपास : खारेबांध-मडगाव येथील प्रकार
मडगाव : खारेबांध-मडगाव येथील एका घरातील व्यक्ती चतुर्थीसाठी आपले घर बंद करून दुसरीकडे गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी काल सोमवारी पहाटे या घरावर डल्ला मारून 3 लाखांचे सोन्याचे दागिने तसेच 1.80 लाखाची रोख रक्कम मिळून 4.80 लाखांचा ऐवज लंपास केला. मडगाव पोलिस या चोरी प्रकरणी तपास करीत आहेत. मात्र, या चोरीत ज्ञात व्यक्तीचा हात असावा, असा कयास मडगाव पोलिसांनी व्यक्त केला आहे. लंगव्वा जामुनी या महिलेच्या घरात ही चोरी सोमवारी पहाटे 2 वाजल्यानंतर झाली असावी अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जामुनी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, चतुर्थी असल्याने घरातील मंडळी रामनगर-कर्नाटक येथे गेली होती. त्यावेळी घरातील मंडळीनी दागिने कपाटात ठेवले होते. तसेच रोख रक्कमही ठेवण्यात आली होती.
चोरट्यांनी घराच्या दर्शनी दरवाज्याला लावलेले कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाट फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम पळवली. याच घरात रहाणारा लंगव्वा जामुनी हिचा भाचा सागर जामुनी हा मध्यरात्री 2 दोन वाजता घरातून बाहेर पडला होता व सकाळी 5 वा. आपल्या घराकडे आला असता, त्याला घराचा दरवाजा तोडलेला दिसून आला. सागर जामुनी याने घरात प्रवेश केला असता, कपाट फोडून चोरट्यांनी सामान टाकलेले त्याला दिसून आले. त्यानंतर त्याने मडगाव पोलिसांना कल्पना दिली. तसेच आपल्या मावशीलाही त्याची माहिती दिली. त्याच्या मावशीने सुमारे 50 हजाराची रोख रक्कम घरात ठेवली होती. सागरने घर दुरूस्तीसाठी 1.30 लाख ऊपये घरात आणून ठेवले होते. ही सर्व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांनी सांगितले. या चोरीबाबत सागर याने पोलिसांना कल्पना दिली असली तरी काल उशिरापर्यंत अधिकृत तक्रार नोंद केली नव्हती.