कांदा दरात घसरण : शेतकऱ्यांचे गेटबंद आंदेलन
रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा : तब्बल साडेचार तास गेटबंद राहिल्याने वाहनधारक ताटकळत : पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे
वार्ताहर/अगसगे
एपीएमसी मार्केट यार्डमध्ये सोमवारच्या बाजारात कांदा दरात घसरण झाल्याने शेतकऱ्यांनी गेटबंद आंदोलन केले. यामुळे रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्याने इतर वाहनांना याचा त्रास सहन करावा लागला. तब्बल साडेचार तास गेटबंद राहिल्याने वाहनांना तेथेच ताटकळत राहावे लागले. त्यामुळे याचा व्यापारावर आणि दळणवळणावर मोठा परिणाम झाला. अखेर एपीएमसी पोलिसांच्या आणि एपीएमसीच्या अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने समस्यांचे निवारण करण्यात आले. गेल्या दोन महिन्यांपासून कर्नाटकातील बेळगाव जिह्यातील नवीन कांदा उत्पादन मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी येत आहे. यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याने कांदा शेतामध्येच भिजला गेला आहे. त्यामुळे कांदा लवकर खराब होत आहे. त्यामुळे खरेदीदार व परराज्यातील खरेदीदार ओला कांदा खरेदी करत नाहीत. यामुळे ओल्या कांद्याला खरेदीदारच नसल्या कारणामुळे खराब कांद्याचा भाव सोमवारच्या बाजारात दोन हजार ऊपये प्रति क्विंटल घसरला आहे. तर उत्तम कांद्याचा भाव 3000 ते 4000 ऊपयेप्रमाणे स्थिरच आहे.
एपीएमसीच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करू, असे आश्वासन दिले आणि त्वरित एपीएमसीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून कांदा-बटाटा व्यापारी असोसिएशनच्या अडत व्यापाऱ्यांना एपीएमसी सभागृहात शेतकऱ्यांसह बैठक घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी विविध जिह्याच्या मार्केट यार्डमध्ये कांदा भाव जास्त आहे. या ठिकाणी कमी आहे, असे सांगितले. त्यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितले की, यावेळी बाजारात सुमारे 28 हजार पिशव्या कांदा आवक विक्रीसाठी आली आहे. यामधील सुमारे 80 टक्के कांदा आवक ओला व खराब कांदा आला आहे. याला समोर गिऱ्हाईकच नाही. मोठमोठे खरेदीदार हा कांदा खरेदी करून इतर राज्यामध्ये पाठवत आहेत. त्यामुळे त्यांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे खरेदीदार केवळ उत्तम व पाकड कांदाच खरेदी करीत आहेत. याला आम्ही तर काय करणार? खराब कांद्याचा भाव 200 पासून दोन हजार ऊपये प्रतिक्विंटल झाला आहे. तर उत्तम कांद्याचा भाव 3000 ते 4000 पर्यंत आहे.
पावसात कांदा भिजल्याने दरात घसरण
दरवर्षी सप्टेंबरपासून कर्नाटकातील नवीन कांद्याच्या आवकेला मोठ्या प्रमाणात सुऊवात होते व पावसात कांदा भिजल्याने कांदा ओलसर आणि कच्चा असल्याकारणाने त्वरित कांदा खराब होतो. यावेळी याला भावदेखील योग्य प्रमाणात असतो. मात्र खराब कांद्याला गिऱ्हाईक नसल्याने त्या कांद्याला कमी भाव मिळतो. त्यामुळे शेतकरी दरवर्षी अशाच प्रमाणे आंदोलने करीत असतो. मागीलवर्षी तर सुमारे पाच ते सहावेळा गेटबंद आंदोलन केले आहेत. यंदा आवक सुऊवात सुरू होऊन दोन महिने झाले आहे. यावेळचे शेतकऱ्यांचे हे पहिले आंदोलन आहे.
रात्री उशिरापर्यंत कामकाज
बारा वाजता लिलावाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनी कांदा सवाल बंद पाडून दुपारी एक वाजता गेटबंद केले आणि साडेपाच वाजता खोलण्यात आले. साडेचार तास सर्व व्यवहार ठप्प राहिल्याने याचा फटका शेतकऱ्यांसह व्यापारी, वाहनचालक, खरेदीदार यांना झाला. यामुळे रात्री उशिरापर्यंत कामकाज सुरू होते. शेतकऱ्यांना आपल्या मालाचे पट्टी घेऊन जाण्यास रात्री दहा ते बारा वाजले. तर काही शेतकऱ्यांवर मुक्काम राहण्याची वेळ आली.