For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फालेरो, सार्दिन, चर्चिल निवडणुकीपासून दूरच

11:59 AM Apr 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
फालेरो  सार्दिन  चर्चिल निवडणुकीपासून दूरच
Advertisement

मुख्यमंत्र्यांची खेळी तर नसावी ना? : अलिप्तता की अंडर ग्राऊंड मॅनेजिंग?,मतदार, कार्यकर्त्यांमध्ये तर्कवितर्कांना ऊत

Advertisement

मडगाव : दक्षिण गोव्यात लोकसभा निवडणुकीत रंग भरू लागले आहेत. काँग्रेस व भाजप यांच्यात सध्या जोरदार चुरस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेनंतर भाजप कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमिवर सासष्टीतील तीन दिग्गज ख्रिश्चन नेते मात्र लोकसभा निवडणुकीपासून दूर राहिले आहेत. ते का दूर राहिले आहेत, याबाबत कारणे स्पष्ट होत नसल्याने मतदारांमध्ये तर्कवितर्क लढविले जात आहेत. विशेष म्हणजे हे तिन्ही नेते गोव्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यात काँग्रेस पक्षाचे मावळते खासदार फ्रान्सिस सार्दिन, माजी खासदार लुईझिन फालेरो व माजी खासदार चर्चिल आलेमाव यांचा समावेश आहे. तिघेही माजी खासदार आणि त्याचबरोबर तिघेही काँग्रेसचे आहेत. सध्या काँग्रेस पक्षाच्या प्रचाराची धुरा युवा पिढीने आपल्या खांद्यावर घेतली आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता काँग्रेसचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. मात्र त्यामध्ये वरील तिघेही नेते कुठेच दिसत नाहीत, याबद्दल तर्कवितर्कांना ऊत आला आहे. फ्रान्सिस सार्दिन हे काँग्रेसमध्ये सक्रिय नसल्याचे अमित पाटकर व युरी आलेमाव यांच्या निदर्शनास आणून दिले असता, ते म्हणाले की, सार्दिन हे प्रचारात सहभागी होतील. पण, अद्याप ते प्रचारात उतरलेले नाहीत.

ही मुख्यमंत्र्यांची खेळी नसावी ना?

Advertisement

चर्चिल आलेमाव हे दोन वेळा दक्षिण गोव्यातून लोकसभेवर निवडून आले होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा बाणावली मतदारसंघात पराभव झाला होता. तेव्हापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत आणि अनेक वेळा मुख्यमंत्र्यांची त्यांनी स्तुती केलेली आहे. चर्चिलने प्रचारापासून दूर रहावे यामागे मुख्यमंत्र्यांची खेळी असावी अशी शक्यताही सासष्टीत व्यक्त केली जात आहे.

काँग्रेसचे प्रयत्न गेले वाया

लुईझिन फालेरो हे राज्यसभेचे खासदार होते. त्यांनी तृणमुल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर जवळपास सक्रिय राजकारणाला सोडचिठ्ठी दिली आहे. ते सध्या पुस्तक लेखनात व्यस्त आहेत. मध्यंतरी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून राजकारणात पुन्हा सक्रिय व्हावे यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, ते पुन्हा सक्रिय झालेले नाहीत.

 सक्रिय राजकारणातून निवृत्त झालोय : लुईझिन

लोकसभा निवडणुकीविषयी बोलताना लुईझिन फालेरो म्हणतात, मी आता राजकारणातून निवृत्त झालेलो आहे. माझे आता लेखनावर अधिक लक्ष आहे. उमेदवार तसेच राजकीय पक्षांचे नेते बऱ्याच दिवसांपूर्वी पाठिंब्यासाठी मला भेटले होते. तरीही लोकसभा निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय मी घेतलेला आहे.

कोणत्याच पक्षाचा प्रचार करणार नाही : चर्चिल

माझे कार्यकर्ते तसेच लोकांसोबतच मी राहणार आहे. यावेळी कोणत्याच पक्षाने वा उमेदवाराने जाहीर सभेसाठी वा प्रचारासाठी मला अजूनपर्यंत निमंत्रित केलेले नाही. यावेळी कोणत्याच पक्षाचा किंवा उमेदवाराचा मी जाहीरपणे प्रचार करणार नाही, असे चर्चिल आलेमाव यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.