Miraj Crime : मिरजेत 42 हजारांच्या बनावट नोटा जप्त !
मिरजमध्ये बनावट नोटांचा प्रकार उघड; २२ वर्षीय तरुण अटकेत
मिरज : पाचशे रुपये चलनाच्या ४२ हजार रुपयांच्या बनावट नोटा बाजारात खपविण्यासाठी आलेल्या एका तरुणाला महात्मा गांधी चौकी पोलिसांनी गजाआड केले. सुप्रित कडाप्पा देसाई (वय २२, रा. इदरगुच्ची, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) असे संशयिताचे नाव आहे.
त्याच्याकडून ५०० रुपयांच्या ८४ बनावट नोटा जप्त केल्या. संबंधित संशयित तरुण हा बनावट नोटा बाजारात खपविण्यासाठी आल्याची माहिती महात्मा गांधी चौकी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी निलजी-बामणी रस्त्यावर कोल्हापूर ब्रिजखाली सापळा लावला होता.
यावेळी संशयित सुप्रित देसाई पोलिसांच्या जाळ्यात सापडला. चौकशी करुन तपासणी केली असता त्याच्याकडे पाचशे रुपये चलनाच्या ४२ हजार रुपयांच्या एकूण ८४ बनावट नोटा मिळून आल्या. या बनावट नोटा जप्त करुन त्याला अटक केली.
दरम्यान, संशयित देसाई हा महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. त्याने या नोटा कुठून आणल्या? तो स्वतः बनावट नोटांची छपाई करत होता का? बनावट नोटा छापणारे आणि खपविणाऱ्यांचे रॅकेट आहे का? याचा तपास पोलीस करीत आहेत.