ATM मशीनमध्ये कोंबल्या पाचशेच्या बनावट नोटा, एकावर गुन्हा दाखल
एचडीएफसी बँकेच्या डिपॉझीट मशिनची फसवणूक, एकाविरुध्द पोलिसात तक्रार
मिरज : छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर एचडीएफसी बँकेच्या कॅश डिपॉझीट मशिनमध्ये एका तरुणाने पाचशे रुपयांच्या सहा बनावट नोटा घालून चक्क एटीएम मशिनचीच फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. मशिनमधील सर्व रोख रक्कमेची मोजदाद करताना हा प्रकार समोर आला असून, सीसीटीव्ही तपासल्यानंतर एका तरुणाने बनावट नोटा मशिनमध्ये घातल्याचे स्पष्ट झाले. याबाबत एचडीएफसी बँकेचे उपशाखा प्रबंधक सचिन तानाजी सुर्यवंशी यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली.
संशयित समुंदर बारमल बेलदार (रा. मु. पो. धाबे, जि. जळगांव) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत माहिती अशी, छत्रपती शिवाजी रस्त्यावर हिरा हॉटेल चौकात एचडीएफसी बँकेची शाखा आहे. लगतच एटीएम मशिन असून, पैसे काढणे आणि जमा करण्यासाठी स्वतंत्र मशिन आहे. सहा जानेवारी २०२५ रोजी एक तरुण पैसे भरण्यासाठी एटीएममध्ये आला. कॅश डिपाझीट मशिनमध्ये त्याने स्वत:चे बँक खाते क्रमांक समाविष्ट केले.
त्यानंतर पाचशे रुपयांच्या सहा बनावट नोटा सदर मशिनमध्ये घातल्या. संबंधीताने पीन टाकून सदर नोटा मशिनमध्ये जमा केल्याने सदर पैसे थेट त्याच्या बँक खात्यावर जमा झाले. काही दिवसनंतर मशिनची देखभाल करणाऱ्या पथकाकडून सर्व रोख रक्कमेची मोजदाद केली. त्यामध्ये पाचशे रुपयांच्या सहा नोटा बनावट असल्याचे आढळले. अधिकाऱ्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजसह मशिनची तांत्रिक तपासणी केली.
सीसीटीव्हीत झालेल्या चित्रणानुसार आणि मशिनमधून मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारावर संशयित बारमल बेलदार याने सदरच्या बनावट नोटा मशिनमध्ये जमा केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार बँक अधिकाऱ्यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी संशयितावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सदरची घटना उघडकीस आल्यानंतर आधुनिक मशिनचीही फसवणूक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. बँकेमध्ये बनावट नोटा जमा केल्यानंतर रंगेहाथ सापडू या भितीने बनावट नोटा खपविणाऱ्यांनी कॅश डिपॉझीट एटीएम मशिनला लक्ष केल्याचे दिसत आहे.