For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंगणवाडी सेविका नियुक्तीचे बनावट पत्र : कारवाईची मागणी

10:35 AM Dec 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
अंगणवाडी सेविका नियुक्तीचे बनावट पत्र   कारवाईची मागणी
Advertisement

ब्लॉक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली भाजप कार्यकर्त्याची पोलखोल :  ‘लैला’ कारखान्याने दर जाहीर करावा

Advertisement

खानापूर : तालुक्यातील भाजपच्या आयटी सेलच्या पदाधिकाऱ्याने महिला बाल कल्याण खात्याचा बनावट शिक्का आणि सरकारी लेटर पॅड तयार करून तालुक्यातील दोन महिलांना अंगणवाडी सेविकेची नियुक्तीची पत्रे दिली होती. मात्र ही बनावट असल्याचे उघड झाल्याने तालुका ब्लॉक काँग्रेसने याबाबत तीव्र आक्षेप घेतला असून, या महाभागावर पोलिसांनी कारवाई करावी, अन्यथा गृहमंत्री परमेश्वर यांना भेटून निवेदन देणार असल्याचे ब्लॉक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी, अर्बन ब्लॉक अध्यक्ष महांतेश राऊत, केपीसीसी सदस्य महादेव कोळी यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी माहिती देताना सांगितले, तालुक्यातील पाली व मळव येथील अंगणवाडी सेविकेची नेमणूक करण्यात येणार होती. यासाठी काही महिलानी अर्ज केला होता. भाजपचा आयटीसेलचा प्रमुख व आमदार विठ्ठल हलगेकर यांचा विश्व़ासू कार्यकर्ता असलेला आकाश अथणीकर यांनी या महिलांना गाठून आपण आमदारांच्या जवळचे असून, तुम्हाला अंगणवाडी सेविका म्हणून नियुक्ती पत्र देतो. म्हणून त्यांच्याकडून काही रक्कम घेतली. त्यानंतर अर्ज केलेल्या महिलांच्या नातेवाईकांनी तगादा लावल्यावर बनावट नियुक्ती पत्र तयार करून महिला बाल कल्याण खात्याच्या लेटर पॅडवर नियुक्ती पत्र तयार करून अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या आणि मी सांगतो तेव्हा तुम्ही अंगणवाडीत हजर व्हा, असे सांगून एप्रिल महिन्यात नियुक्ती पत्र दिले होते. मात्र या अंगणवाडीत खात्यातर्फे अधिकृत महिलांची नियुक्ती केल्यानंतर आपण फसलो गेलो असल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी आकाश अथणीकर यांच्याकडे याबाबत विचारणा केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देवून टाळाटाळ करण्यात येत होती. अखेर फसगत झालेल्यानी ब्लॉक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून नियुक्ती पत्र आणि पैसे दिलेल्याचे पुरावे सादर केले. खानापूर पोलिसात याबाबत माहितीही दिली.

Advertisement

अथणीकरकडून अनेक फसवणुकीचे प्रकार

अथणीकर हा वकील नसताना कोर्टात कोट घालून वावरत होता. याबाबत काही महिन्यापूर्वी मी बार असोसिएशनचा अध्यक्ष या नात्याने त्याला कोर्ट आवारात तसेच कोर्टात कोट घालून वावरण्यास मज्जाव केला आहे. त्यांचे इतरही अनेक फसवणुकीची प्रकरणे असल्याचे घाडी यांनी सांगितले.

पोलीस प्रमुखांकडे तक्रार करण्याचा इशारा

यावेळी सुरेश जाधव म्हणाले, आकाश अथणीकर यांने अनेकांची फसवणूक केल्याची प्रकरणे उघडकीस येत आहेत. खानापूर पोलिसानी याबाबत सूमोटो कारवाई करावी, अन्यथा याबाबत पोलीस प्रमुखांकडे तक्रार करणार असून खानापूर पोलिसांचा चाललेला गैरकारभार तसेच अनेक प्रकरणात तडजोडी करून फिर्यादीवरच दडपण आणून आरोपीला मदत करण्यात येत असल्याची प्रकरणे उघडकीस येत आहेत. जिल्हा पोलीस प्रमुखांनी खानापूर पोलीस स्थानकाची चौकशी करावी आणि गैरकारभारात सहभागी असलेल्या पोलिसावर कारवाई करावी.

लैला कारखाना अद्याप बंदच

यावेळी अर्बन ब्लॉकचे अध्यक्ष महांतेश राऊत म्हणाले, असे गैरकारभार करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, तसेच लैला साखर कारखाना यावर्षी अद्याप सुरू झालेला नाही. उसाचा दर जाहीर करून कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करावा. यावेळी काँग्रेसचे नेते जॅकी फर्नांडिस, संगमेश वाली, महावीर हुलीकवी यांनीही साखर कारखान्याबाबत योग्य निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी केली. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी लक्ष्मण मादार, विवेक तडकोड, भरतेश तोरोजी, देमाण्णा बसरीकट्टी, तोईद चांदकन्नावर, इसाकखान पठाण, वैष्णवी पाटीलसह पदाधिकारी, कार्यकर्ते होते.

उसाचा दर जाहीर करूनच गळीत हंगाम सुरू करा

केपीसीसी सदस्य महादेव कोळी म्हणाले, आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आमदार होण्याअगोदर शेतकऱ्यांना अगाऊ रक्कम देऊन उसाचा दर अगोदरच जाहीर करून गळीत हंगाम सुरू करत होते. मात्र यावर्षी डिसेंबरची 15 तारीख आली तरी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू नाही. तसेच एफआरपीप्रमाणे दरही जाहीर करण्यात आलेला नाही. फक्त राजकारणासाठी आमदार निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांची सहानभुती मिळवण्यासाठी नाटक केले का, असा प्रश्न कोळी यांनी उपस्थित केला. कोणत्याही परिस्थितीत प्रथम उसाचा दर जाहीर करूनच गळीत हंगाम सुरू करावा.

बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्यावर कायदेशीर क्रम घ्या

माजी आमदार आणि एआयसीसीच्या सचिव प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, भाजपचा वरिष्ठ पदाधिकारी धाडसाने बनावट कागदपत्रे करून सामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक करत असताना याला राजकीय वरदहस्त लाभल्याशिवाय कोणीही इतके धाडस करत नाही. भाजपचा पदाधिकारी असल्याने आमदार विठ्ठल हलगेकर आणि राज्य भाजपचे वरिष्ठ नेते या कार्यकर्त्याला वाचवत आहे का? पोलिसांवर राजकी दबाव आहे का, हे ही स्पष्ट झाले पाहिजे. अलीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून अनेक फसवणुकीचे प्रकार उघडकीस येत आहेत. बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी आणि कायदेशीर क्रम घेण्यात यावा.

- माजी आमदार अंजली निंबाळकर

Advertisement
Tags :

.