तोतया आयबी अधिकाऱ्याला अटक
माळमारुती पोलिसांची कारवाई
बेळगाव : सेंट्रल आयबी अधिकारी असल्याचे सांगून आर्थिक फसवणूक करणाऱ्याला माळमारुती पोलिसांनी मंगळवारी अटक केली. दयानंद रामू जिंड्राळे (वय 33 रा. इस्लामपूर, ता. हुक्केरी व सध्या रा. अंजनेयनगर बेळगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अफझल रेहमान बीडी (रा. बुडा लेआऊट ऑटोनगर) यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून माळमारुती पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी सदर कारवाई केली आहे.
आपण सेंट्रल आयबीमध्ये एआयसीओ अधिकारी असून आपल्या मित्राचा अपघात झाला आहे. यासाठी पैशांची गरज असून तक्रारदार अफझल यांच्याकडून 5 लाख रुपये घेतले होते. मात्र, सदर रक्कम परत देण्यास टाळाटाळ चालविली होती. ही रक्कम देताना वेगवेगळ्या सह्या करून 50 हजार आणि 3 लाखाचे धनादेश देऊन फसवणूक केली आहे, अशी तक्रार अफझल यांनी दाखल केली आहे. यावरून संबंधितावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अटक केलेल्या संशयित दयानंद जिंड्राळे याच्याकडून 1 कार जप्त केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदर संशयिताने रायबाग, चिकोडी, निपाणी, कागवाड, हारुगेरी अशाप्रकारे अनेक ठिकाणी खोटी माहिती देऊन फसवणूक केली आहे. दिल्ली, मुंबई, बेंगळूर सेंट्रलमध्ये आयबी कमिशनर अधिकारी असल्याची खोटी माहिती देऊन अनेकांना केएसआरटीसी, अबकारी आणि वनखात्यात नोकरी लावण्याचे सांगून फसवणूक केली आहे. एकट्याकडून 5 लाख घेऊन फसवणूक केली आहे. त्याच्या नावे अनेक बँकांमध्ये खाती असल्याचे उघड झाले आहे. विविध बँकांचे एटीएम कार्ड, वनखात्याचे ओळख पत्र जप्त करण्यात आले आहे.