राज्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट
256 जणांचा शोध : कायदेशीर कारवाई
बेंगळूर : राज्य आरोग्य खात्याने बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन कारवाई करण्याचा प्रयत्न चालविला असला तरी बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट अद्याप थांबलेला दिसून येत नाही. एप्रिल 2024 पासून आतापर्यंत राज्यात विविध ठिकाणी 256 बोगस डॉक्टरांचा शोध आरोग्य खात्याने लावला आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाईही केली आहे. यापैकी 4 डॉक्टरांवर एफआयआर दाखल केला आहे. राज्यात 89 क्लिनिक बंद करण्यात आले असून 154 बोगस डॉक्टरांना दंड ठोठावला आहे. यापैकी केवळ 39 जणांनी दंड भरला आहे. तर 9 प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. राज्याच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये बोगस डॉक्टर अधिक प्रमाणात आढळून आले आहेत.
कलबुर्गीत 111, कोलारमध्ये 31, चामराजनगर 22, हावेरी 13, बेंगळूर शहरात 12 बोगस डॉक्टर आढळून आले आहेत. गदग, हासन, कोडगू, कोप्पळ, मंड्या, रायचूर, रामनगर, शिमोगा, तुमकूर व कारवार या जिल्ह्यांमध्ये एकही बोगस डॉक्टर आढळून आलेला नाही. बीएस्सी, एमएस्सी केलेले ब्युटीशियन कोर्स करून आपण डॉक्टर असल्याचा बनाव करत त्वचारोगावर उपचार करत असल्याचे मोठ्या प्रमाणावर दिसून आले आहेत. या संदर्भात डेर्मटॉलॉजिस्ट असोसिएशनने बनावट डॉक्टरांच्या क्लिनिकची यादी तयार केली असून जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्यामार्फत तपास चालवून संबंधितांवर कारवाई सुरू केली आहे.
केपीएमई कायद्यानुसार कारवाई
राज्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट रोखण्यासाठी केपीएमई अधिनियम-2007 च्या सेक्शन 21 अन्वये तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना काही अधिकार देण्यात आले आहेत. हे अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातील खासगी वैद्यकीय केंद्रांना भेट देत आहेत. बोगस डॉक्टर आढळून आल्यास त्यांच्यावर केपीएमई कायद्यानुसार कारवाई करण्याचा अधिकार तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.
शिक्षेची तरतूद
पहिल्या तपासात बोगस डॉक्टर आढळून आल्यास संबंधिताला 25 हजारचा दंड, दुसऱ्यांदा सापडल्यास 2.50 लाख रुपये दंड व 1 वर्षाची कारावासाची शिक्षा तसेच तिसऱ्या वेळेस बोगस डॉक्टर आढळून आल्यास 5 लाख रुपयांचा दंड व 3 वर्षांची कारावासाची शिक्षा देण्यात तरतूद केपीएमई कायद्यानुसार आहे.