Satara News: बॉम्ब स्फोट झाला, अज्ञाताचा फोन, पोलिसांची पळापळ
दारूच्या नशेत फोन करणाऱ्याला केली अटक
सातारा: डायल 112 वर शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने फोन करून बॉम्ब स्फोट झाल्याची अर्धवट माहिती देऊन कॉल कट केला. या फोनमुळे सातारा पोलीस दलात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ या कॉलची माहिती घेत त्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी या नंबरवर फोन करून चौकशी केली असता तो व्यक्ती सातारा एसटी स्टॅण्डमध्ये असल्याचे त्याने सांगितले. तेथे जावून पाहणी केली असता त्याने दारूच्या नशेत फोन करून खोटी माहिती दिल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. महिला, वयोवृद्ध, लहान मुले यांना तात्काळ मदत मिळावी म्हणून पोलीस प्रशासनाकडून डायल 112 ही हेल्पलाईन सुरू केली आहे. परंतु या हेल्पलाईनवर फेक कॉलचा सुळसुळाट सुरू आहे.
असाच फेक कॉल शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता आला. हॅलो, सातारा एसटी स्टॅण्डमध्ये बॉम्ब स्फोट झाला आहे. असे सांगून अज्ञाताने कॉल कट केला. हे ऐकताच सातारा पोलीस दलात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती वरिष्ठांना देत सर्व यंत्रणा कामाला लागल्या.
पोलिसांनी पुन्हा त्या नंबरवर फोन केला. यावेळी अज्ञाताने एसटी स्टॅण्ड वर असल्याचे सांगितले. पोलीस स्टॅण्डवर पोहोचले. त्यांनी परिसरात बॉम्ब स्फोट झाल्याबाबत चौकशी केली. परंतु अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे त्यांना सांगितले.
पोलिसांनी अज्ञाताला बसस्थानकातून ताब्यात घेतले. तेव्हा तो दारूच्या नशेत असल्याचे लक्षात आले. त्याने आकाश राजेंद्र भोसले (वय 30, रा. मोळाचा ओढा सातारा) असे नाव सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत सातारा शहर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार शंकर चव्हाण यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार सावंत करत आहेत.