दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट
गोव्यातील प्रकल्पांसाठी केली सहकार्याची मागणी : माजी उपपंतप्रधान अडवाणींचे घेतले आशीर्वाद
पणजी : आपल्या पूर्वनियोजित दौऱ्यानुसार नवी दिल्लीला गेलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या आणि गोव्यातील प्रकल्पांसाठी त्यांच्याकडे सहकार्याची मागणी केली. तसेच माजी उपपंतप्रधान तसेच भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची त्यांच्या घरी जाऊन विचारपूस केली. दिल्ली दौरा हा राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा नव्हता तर विकासकामांच्या अनुषंगाने तो महत्त्वाचा होता, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या कन्येच्या विवाहनिमित्त आयोजित समारंभात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे रविवारी रात्री नवी दिल्लीला रवाना झाले. दौऱ्यावर निघण्यापूर्वी रविवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी दैनिक ‘तरुण भारत’शी बोलताना आपला दौरा हा पूर्वनियोजित आहे. त्याचा कोणत्याही राजकारणाशी संबंध नाही, असे स्पष्ट केले होते.
लालकृष्ण अडवाणींच्या निवासस्थानी
नवी दिल्लीत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काही केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यांना माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या घरी जाऊन त्यांचे दर्शन घेण्याची इच्छा होती. मुख्यमंत्र्यांनी अडवाणींची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. आपल्या दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांची भेट घेऊन गोव्यात होऊ घातलेल्या एका मोठ्या क्रीडा स्पर्धेसाठी केंद्राच्या सहकार्याची मागणी केली. सोनोवाल हे जहाजोद्योगमंत्री देखील आहेत व त्यांच्या अंतर्गत बंदरे येत असल्याने मुरगाव बंदर परिसरातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वास्तू व स्थळांचा ताबा गोव्याच्या पुरातत्व खात्याकडे देण्यात यावा, अशी आग्रही मागणी केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आज मंगळवारी सकाळी गोव्यात येत आहेत. त्यानंतर गोवा विद्यापीठात होणाऱ्या भारतीय राज्यघटनेची 75 वर्षे या विषयावरील कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील नव्या सरकारचा शपथविधी दोन दिवस पुढे ढकलला असल्याने मुख्यमंत्री डॉ. सावंत हे दिल्लीहून थेट मुंबईला जाणार होते त्या कार्यक्रमात त्यांनी बदल केला. मुंबईऐवजी ते थेट गोव्याकडे येणार आहेत.