बागा येथे बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश
प्रतिनिधी/ पणजी
सावंतवाडा-बागा, कळंगुट येथे सुऊ असलेल्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करून कळंगूट पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे. संशयितांकडून तीन लॅपटॉप, आठ मोबाईल व इतर वस्तू मिळून एकूण 3 लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. संशयितांच्या विरोधात भारतीय न्याय सं. कलम 11(2)(ब), 319(2), 318(4), 3(5) व माहिती आणि तंत्रज्ञान कायदा कलम 66 ड अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयितांमध्ये अभिषेक हरीराम पुरी (27), मोह. फरीद (28), एसके अमिर आलम (38), रमेश शॉ (29) व अजोय उमेश गीर (19) यांचा समावेश असून ते पश्चिम बंगालमधील रहिवासी आहेत. बनावट कॉल सेंटरद्वारे ऑनलाईन संगणक सेवा देण्याच्या नावाखाली विदेशी नागरिकांची लुबाडणूक केली जात होती. याबाबत कळंगुट पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी सावंतवाडा बागा कळंगुट येथील एका फ्लॅटमध्ये थाटण्यात आलेल्या बनावट कॉल सेंटरवर कारवाई केली.
पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हरीश वायंगणकर, किरण नाईक व सहकारी पथकाने सदर फ्लॅटवर छापा टाकला आणि संशयितांना अटक केली. संशयितांनी विदेशी नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी पोर्टसिप यूसी या अॅपचा वापर केला. संशयित टोळीने अमेरिका व यूकेसारख्या देशात संकेतस्थळावर वरील अॅपची जाहिरात टाकली होती. सदर जाहिरात वाचून विदेशी नागरिक आपला संगणक दुऊस्ती करण्यासाठी संशयितांशी संपर्क साधत होते. त्यानंतर संशयित या नागरिकांना ऑनलाईन संगणकाची दुऊस्ती तसेच संगणकाचा स्पीड कमी झाल्याने ती वाढवून देण्याचा बहाणा करत. त्यानंतर ही सेवा देण्यासाठी गिफ्ट कार्डद्वारे सेवाशुल्क भरण्यास प्रवृत्त करीत होते. गिफ्ट कार्डची रक्कम ते भारतीय चलनात हस्तांतरीत करत. संशयितांनी अनेक विदेशी नागरिकांना अशाप्रकारे आपल्या जाळ्यात ओढून त्यांची लुबाडणूक केली असल्याचा संशय आहे.