Crime News: बनावट अॅपद्वारे मोबाईल विक्रेत्याची हजारोंची फसवणूक, गुन्हा दाखल
मोबाईल विक्रेत्याची हजारोंची फसवणूक, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
लांजा: बनावट ऑनलाईन अॅपचा वापर करून अज्ञाताने लांजा शहरातील एका मोबाईल विक्रेत्याची 36 हजार 999 रुपयांची फसवणूक केली. या बाबत लांजा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची तक्रार प्रकाश विद्यानंद शर्मा (35, रा. बावधनकर चाळ, वैभव वसाहत लांजा, मूळ गाव मिश्रवलिया, तालुका-मंझा, जिल्हा-गोपालगंज) यांनी लांजा पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश शर्मा यांचे लांजा शहरात मोबाईल विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे.
दुकानात 8 जून रोजी दुपारी 12.30 वाजता एका अज्ञात व्यक्तीने येऊन मला मोबाईल खरेदी करायचा आहे, असे सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने 36 हजार 999 रुपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल खरेदी केला.
मोबाईलचे पैसे फोन-पे द्वारे करतो, असे सांगून बनावट अॅपद्वारे त्याने पैसे पे केल्याचे दुकानदार प्रकाश शर्मा यांना सांगितले. मात्र पैसे न आल्याने त्यांनी त्या व्यक्तीला विचारल्यास त्याने नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, असे सांगितले. काही वेळाने पैसा जमा होतील, असे सांगून व्यक्ती तिथून निघून गेला.
मात्र बऱ्याच वेळानंतरही पैसे जमा न झाल्याने त्यांनी त्या व्यक्तीशी संपर्क केला. मात्र या व्यक्तीचा मोबाईल स्विच ऑफ लागला. त्यामुळे प्रकाश शर्मा यांनी याबाबत शुक्रवार 4 जुलै रोजी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी लांजा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318(2) अन्वये गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस राजेंद्र कांबळे करत आहेत.