कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विरोधकांत बिघाडी, भाजपची आघाडी!

01:24 PM Dec 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आघाडीबाबत अजूनही भिजत घोंगडे : काँग्रेस आरजीपी, आपकडून स्वतंत्र उमेदवार जाहीर

Advertisement

पणजी : भारतीय जनता पक्षाने (भाजप) जिल्हा पंचायत निवडणुकीत उमेदवार जाहीर करण्यासोबतच प्रचारातही आघाडी घेतली असून विरोधी पक्षात मात्र बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. आम आदमी पक्षाने (आप) या निवडणुकीत वेगळी चूल मांडून उमेदवार जाहीर केल्यामुळे ते विरोधी आघाडीत नसल्याचे उघड झाले आहे. भाजपने बहुतेक सर्व जागांवर उमेदवार दिले असून आपने 29 जागांवर तर काँग्रेसने 11 आणि आरजीपीने 12 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.

Advertisement

गोवा फॉरवर्डने अद्यापही उमेदवार यादी जाहीर केलेली दिसत नाही. त्या पक्षाने काही उमेदवार निश्चित करुन त्यांना प्रचार सुरु करण्याची सूचना दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस, आरजी आणि गोवा फॉरवर्ड यांची आघाडी होणार अशी चर्चा होती. तसेच प्रयत्न देखील चालू होते आणि अजूनही चालू आहेत असे निवेदन काँग्रेस पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केले आहे. प्रत्यक्षात युतीचे घोंगडे भिजत पडले असल्याचे दिसून येत आहे. युती न होताच किंवा न करताच विरोधी पक्ष आपापले उमेदवार जाहीर करत असल्याने युती किंवा आघाडी होण्याची शक्यता दिवसेंदिवस धुसर होत चालली आहे.

विरोधकांमध्ये समन्वयाचा अभाव

खरे म्हणजे तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन आघाडी उमेदवारांची नावे जाहीर करण्याची गरज होती परंतु तसे घडलेले नाही. विरोधी पक्ष आपापल्या सोयीनुसार इतर विरोधी पक्षांना विश्वासात न घेता उमेदवार जाहीर करीत असल्याने एकूणच सर्व विरोधी पक्षात समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे. त्याचा लाभ भाजपला मिळणार अशी चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजूनही आघाडीच्या आशेवर

उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली तरी देखील आघाडी होत नाही. अर्ज भरण्याचे चार दिवस संपले तरी विरोधी पक्षांमध्ये आघाडीबाबत काहीच दिसून येत नाही. प्रचारही सुरु झालेला नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर मात्र आघाडी होणार म्हणून अजूनही आशेवर असल्याचे दिसून येत आहे.

आरजीपचे 12 उमेदवार

उत्तर गोवा : तोरसे-नारायण शिरोडकर, कोलवाळ-प्रज्ञा सावंत, शिरसई-सिप्रियान परेरा, शिवोली-जयनाथ पाडलोसकर, हणजूण-मिंगेल क्वोरोझ, सांताक्रूझ-एस्प्रेन्सा ब्रागांझा, सेंट लॉरेन्स-तृप्ती बकाल.

दक्षिण गोवा : वेलिंग-प्रियोळ-नीता जल्मी, बेतकी - खांडोळा - विनय गावडे, कवळे-विश्वेश नाईक, बोरी-हर्षा बोरकर, शिरोडा-दीपनिती शिरोडकर.

भाजपचे तब्बल 40 उमेदवार जाहीर

भाजपने चार याद्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 40 उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यात सोमवारी 19, मंगळवारी 10 आणि बुधवारी 9 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. गुऊवारी त्यात आणखी दोन नावे जोडली गेली असून एकुण संख्या 40 वर पोहोचली आहे. भाजपचे उत्तरेत 24 आणि दक्षिणेत 16 उमेदवार झाले आहेत. सत्यविजय नाईक (दवर्ली-ओबीसी) आणि लक्ष्मी शेटकर (नावेली-महिला ओबीसी) यांचा कालच्या यादीत समावेश आहे.

आतापर्यंत 12 उमेदवारांचे अर्ज दाखल

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेंतर्गत आतापर्यंत 12 इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात फ्रांझिलिया रॉड्रिगीश (कळंगुट-भाजप), अमित अस्नोडकर (सुकूर-भाजप), रेश्मा बांदोडकर (रेईश मागूश-भाजप), सुश्मिता पेडणेकर (रेईश मागूश-भाजप), संदीप साळगांवकर (पेन्ह द फ्रान्स-भाजप), मनिषा उसगांवकर (उसगांव-काँग्रेस), सुनिल जल्मी (बेतकी खांडोळा-अपक्ष), मोहन गांवकर (सावर्डे-भाजप), ऊपेश देसाई (धारबांदोडा-भाजप), दीक्षा पागी (पैंगिण-अपक्ष) आणि विपीन गांवकर (पैंगिण-अपक्ष) यांचा समावेश आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article