मडगावात ज्वेलरी दुकानावर दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न
कर्मचाऱ्याच्या डोक्यावर हातोड्याने वार
मडगाव : बोर्डा-मडगाव येथे एका दुकानावर काल मंगळवारी सायंकाळी दरोडा घालण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोर्डा-मडगाव येथे असलेल्या एका ज्वेलरी दुकानात मंगळवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास हा दरोड्याचा प्रकार घडला. या पेढीवर आलेल्या हल्लेखोराने डोक्यावर बुरखा घातलेला होता. दुकानातील सोन्याचे दागिने लुटण्याच्या इराद्यानेच हल्लेखोर आलेला असावा, असा अंदाज आहे. दुकानातील सोहन नावाच्या व्यक्तीच्या डोक्यावर या बुरखाधारी हल्लेखोराने दुकानातच असलेल्या एका हातोड्याने चारवेळा वार केले. इतकेच नव्हे तर तेथे असलेल्या आणखी एका व्यक्तीच्या हातावर याच बुरखाधारी हल्लेखोराने सुऱ्याने वार करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी फातोर्डा पोलिसांकडे संपर्क केला तेव्हा पोलिसांनी काहीही सांगण्यास नकार दिला आणि पोलिस घटनास्थळी गेलेले असल्याची माहिती दिली.
वाऱ्यासारखी पसरली वार्ता
बोर्डा-मडगावातील या सराफी दुकानावर बुरखाधारी व्यक्तीकडून झालेल्या हल्ल्यासंबंधीची माहिती काही क्षणातच उत्तर गोव्यातील सराफी संघटनेच्या कानावर गेली आणि नंतर सर्व सदस्यांना सावध करण्यात आले. या सराफी दुकानावर झालेल्या या कथित हल्ल्यामागे किमान तिघांची टोळी असावी असा अंदाज व्यक्त होत आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी चांदर येथेही असाच हल्ला झाला होता. त्या हल्ल्यामागे प्रत्यक्ष दोघेजण सीसीटीव्हीमध्ये दिसत असले तरी आणखी एकटा असावा, असाही अंदाज व्यक्त होत आहे.