नड्डा यांच्यानंतर फडणवीस होणार भाजप अध्यक्ष?
पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीमुळे राजकीय चर्चांना उधाण
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जगतप्रकाश नड्डा यांच्यानंतर भाजपची धुरा कोण हाती घेणार याविषयीच्या चर्चेच्या जोर पकडला आहे. याचदरम्यान पक्षाच्या सर्वोच्च पदावर महाराष्ट्रातील नेत्याची निवड होणार असल्याचे कयास वर्तविले जात आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अलिकडेच झालेल्या भेटीमुळे ही चर्चा सुरू झाली आहे. फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मर्जीतील नेते म्हणून ओळखले जातात.
ऑगस्टच्या अखेरपर्यंत भाजपला नवा अध्यक्ष मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षप्रमुख पदासाठी पक्षाकडून काही नावांवर विचार केला जात असून यात महाराष्ट्रातील दोन नेत्यांचा समावेश आहे. यात फडणवीस यांच्यासोबत पक्षाचे महासचिव विनोद तावडे यांचेही नाव सामील असू शकते. परंतु भाजपकडून यासंबंधी अधिकृतपणे काहीही सांगणे टाळले जात आहे.
भाजपचे नेतृत्व पक्षप्रमुखपदासाठी फडणवीस यांची निवड करू इच्छित असल्याची चर्चा आहे. यापूर्वी समोर आलेल्या नावांवरून संघ आणि भाजप नेतृत्वामध्ये मतभेद होते, परंतु फडणवीस यांच्या नावावर सहमती होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि मोदी यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.
मंत्रिपद का अध्यक्ष?
फडणवीस यांना पक्षाचे प्रमुख करण्यात यावे का केंद्रात कॅबिनेट मंत्री यावर पक्षात दोन प्रकारचे विचार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फडणवीस यांना पक्षाध्यक्ष करण्याच्या बाजून आहे. फडणवीस यांना राष्ट्रीय राजकारणात मोठी भूमिका बजावता यावी आणि भविष्यातील जबाबदारीसाठी त्यांना तयार करण्यात यावे असा यामागील विचार असल्याचे मानले जात आहे.
महाराष्ट्रात लवकरच निवडणूक
महाराष्ट्रात सध्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे आघाडी सरकार सत्तेवर आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत. राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार असल्याने भाजप अध्यक्षपदाविषयी लवकर निर्णय घेतला जाणार असल्याचे मानले जात आहे. भाजप अध्यक्षपदी फडणवीस यांची निवड झाली तर राज्यस्तरावर नव्या नेत्याकडे जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे.