पृथ्वीचे नेत्र...निसर्गाचे चमत्कारक्षेत्र
नेत्र किंवा डोळा हा आपल्या शरिरातील महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. मानवाच्या उत्क्रांतीत आणि प्रगतीत याची भूमिका अनन्यसाधारण अशीच आहे. त्यामुळे कोठेही नेत्राच्या आकाराचे काहीही पहावयास मिळाले की त्याला त्या वस्तूचा ‘डोळा’ असे म्हणण्याचा प्रघात असतो. जसे, झाडाच्या फांदीचा ‘डोळा’, ज्यातून नवे झाड उगवते. याच प्रकारे आपल्या पृथ्वीलाही एक नेत्र आहे.
युरोपातील क्रोएशिया येथील एका छोट्या सरोवराला ‘पृथ्वीचे नेत्र’ ही उपाधी लाभलेली आहे. हा निसर्गाचा एक चमत्कार मानला जातो. सॅटीना या नदीचा जलस्रात म्हणून हे सरोवर ओळखले जाते. त्याचे नाव इझ्वोर सॅटीना असे तेथील स्थानिक भाषेत आहे. त्याचा आकार मानवी डोळ्यासारखा असून त्याला दुरुन अगर जवळून पाहिले असता ते नेत्रासारखेच भासते. म्हणूनच त्याला पृथ्वीचे नेत्र असे म्हणतात. त्याचे पाणी अतिशय स्वच्छ आणि नेहमी अत्यंत थंड असते. तथापि, या सरोवरात डुबकी घेण्याचे धाडस फारच थोडे लोक दाखवू शकतात.
कारण, या सरोवराच्या तळाशी जे दडलेले आहे, त्यासंबंधी बऱ्याच वदंता आहेत. हे सरोवर 155 मीटरहून अधिक खोल आहे, असे पाणबुड्या लोकांचे म्हणणे आहे. तथापि, प्रत्यक्षात ते त्याहीपेक्षा खोल असावे, असे अनेकांचे म्हणणे आहे. कारण अद्यापपावेतो त्याची खरी खोली मापण्याचे धाडस कोणालाही झालेले नाही. सरोवराच्या तळाशी दगडांच्या रांगा असून त्यामधून जाणारा एक मार्गही स्पष्ट दिसतो. या मार्गाच्या संदर्भात बऱ्याच आख्यायिका आहेत. एकंदर, हे सरोवर आपल्या पोटात बऱ्याच गूढ बाबी घेऊन बसलेले आहे, असे बोलले जाते. त्यामुळे त्याच्या अधिक खोलात शिरायला कोणी तयार होत नाहीत. इतकेच काय, या देशाचे सरकारही त्यासंबंधी फारसे संशोधन करायला तयार नाही. त्याच्या या गूढत्वामुळेच त्याचे ‘दर्शन मूल्य’ वाढले असून हे सरोवर पहाण्यासाठी प्रतिवर्ष लक्षावधींच्या संख्येने पर्यटक येतात. आकाशातून या सरोवराच्या तळाची छायाचित्रे काढण्यात आली आहेत. पण तेथे नेमके काय आहे, हे प्रत्यक्षात कोणीही पाहिलेले नाही. या रहस्यामुळेच या सरोवराला एक आगळे वेगळे वैशिष्ट्या मिळाले आहे.