For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहरातील उष्म्यात कमालीची वाढ

10:37 AM Mar 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहरातील उष्म्यात कमालीची वाढ
Advertisement

उष्णतेची लाट येण्याची शक्यता : काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन

Advertisement

बेळगाव : शहरात उष्मा कमालीचा वाढू लागला आहे. वाढत्या उन्हामुळे लाहीलाही होत असून, नागरिक हैराण झाले आहेत. दरवर्षी उन्हाच्या झळांमध्ये वाढ होत असून उन्हाळा तीव्र होत चालला आहे. आरोग्य खात्याने उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. आणि त्यादृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन करून काही सूचना केल्या आहेत. उष्मा लाटेचा परिणाम कोणावरही होऊ शकतो. परंतु प्रामुख्याने लहान मुले, गर्भवती, मानसिक अस्वास्थ असणाऱ्या व्यक्ती, शारीरिकदृष्ट्या आजारी व्यक्ती यांची काळजी विशेषत्वाने घ्यायला हवी, असेही आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे. याशिवाय मदतीसाठी 108/102 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनेही केले आहे.

आहार घेण्याच्या सूचना

Advertisement

  • तहान लागली असूदे अथवा नसूदे भरपूर पाणी प्या.
  • प्रवासाला जाताना पाण्याची बाटली सोबत घ्या.
  • लिंबू पाणी, ताक, लसी, फळांचे ज्यूस तसेच ओआरएस यापैकी कशाचेही सेवन करा.
  • हंगामात मिळणारी फळे म्हणजेच कलिंगड, मोसंबी, द्राक्षे, अननस यांचे तसेच काकडीचे सेवन करा.
  • सुती व फिक्या रंगाचे कपडे परिधान करा.
  • उन्हात फिरण्याची वेळ असल्यास टोपी किंवा छत्री किंवा टॉवेल या कशाचाही वापर करा.
  • थेट सूर्यप्रकाशापासून संरक्षण करा.
  • प्रसारमाध्यमातून प्रसारित होणाऱ्या हवामान खात्याच्या बातम्यांवर लक्ष ठेवा.
  • शक्यतो हवेशीर जागेमध्ये बसा.
  • दिवसा खिडक्या बंद ठेवा व सायंकाळनंतर त्या उघडा.
  • बाहेर उन्हामध्ये जाण्याचा प्रसंग असेल तर स्वत:ची काळजी घ्या अथवा कामाची वेळ बदलून घ्या.

कार्यालयीन सूचना

  • शक्यतो सकाळी 11 पर्यंत किंवा दुपारी 4 नंतर बाहेरच्या कामांना प्राधान्य द्या.
  • सार्वजनिक ठिकाणी आयोजित कामांमध्ये आयोजकांनी पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
  • कार्यालयांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा व दर 20 मिनिटांनी पाणी प्या.
  • कार्यालयांमध्ये थेट प्रकाशापेक्षा शक्यतो सावली किंवा थंड ठिकाणी बसण्याची व्यवस्था करा.
  • कामगारांना बाहेर पाठवायचे असल्यास सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेत पाठवा.
  • उष्मा लाट किंवा उन्हाच्या तडाख्यामुळे शरीरावर होणाऱ्या परिणामांची कामगारांना कल्पना द्या.
  • कार्यालयामध्ये प्रथमोपचाराची व्यवस्था करा.
  • जर अपरिहार्य कारणामुळे बाहेर जाऊन काम करणे आवश्यक असेल तर लांब बाह्याचे, फिक्या रंगाचे कपडे परिधान करा.
  • कर्मचाऱ्यांना उष्मा लाटेबद्दल जागृत करा.
Advertisement
Tags :

.