महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रत्यर्पण

06:29 AM Nov 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय एकोणतिसावा

Advertisement

भगवंतांनी उद्धवाला आत्मज्ञानाचा उपदेश केला. तो त्याला समजला की नाही असा प्रश्न त्यांनी विचारल्यावर त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना उद्धवाने दिले उद्धवाचे उत्तर म्हणजे भगवंताच्या उपदेशाचा सारांश होता असे म्हंटले तरी चालेल. उद्धव म्हणाला, गोविंदा तुझ्या सान्निध्यात येथून पुढे भय कधीच वाटणार नाही. शोक मोह आणि स्वत:च्या देहाविषयी वाटणाऱ्या ममतेमुळे माया लोकांना प्रपंचाशी बांधून ठेवते परंतु तुझ्या सहवासात ती आपोआपच नाहीशी होते. जन्ममरणाचे अपार दु:ख ज्याने अनेकवेळा सोसले आहे तो तुझ्या सान्निध्यात आला की, त्याचे भवभय समूळ नष्ट होते. मी म्हणजे हा देह आणि समोर दिसणारे जग खरे आहे ह्या दोन गैरसमजुतीतून निर्माण होणाऱ्या अज्ञानाचे निरसन होण्यासाठी सत्संगाची अत्यंत गरज आहे. सत्संगामध्ये उत्तम सत्संग कोणता असा विचार केला तर तुमची संगती सगळ्यात उत्तम आहे. दीनजनांचा उद्धार व्हावा हे अत्यंत कळकळीने तुम्हाला वाटते आणि त्यासाठीच हे गुढाहून गूढ असलेले निजात्मज्ञान माझे निमित्त करून तुम्ही प्रकाशात आणले. त्यांचे अज्ञान नष्ट व्हावे म्हणून तुम्ही हा ज्ञानदीप पूर्ण क्षमतेने प्रज्वलित केलात. ज्यांना उपदेश करायचा त्यांची सांगणाऱ्यावर श्रद्धा असणे अत्यंत महत्त्वाचे असते. ती नसेल तर केलेला उपदेश पालथ्या घड्यावर पाणी ओतल्याप्रमाणे वाया जातो पण जर ऐकणारा श्रद्धावान असेल तर त्याची श्रद्धा त्याला एखाद्या छोट्याशा दिव्याप्रमाणे किंवा पणतीप्रमाणे पुढील मार्ग दाखवत असते. त्यामुळे त्यांना निजात्मसुख मिळवण्याची युक्ती एखाद्या जीवश्च कंठश्च मित्राप्रमाणे सदैव त्यांच्या जवळ राहते आणि मित्राप्रमाणेच त्यांना उपयोगी पडते. हा दिवा मोठा वैशिष्ट्यापूर्ण असतो. तो विवेक आणि वैराग्याच्या वाती त्यात असतात. अशा विशेष प्रकारच्या वाती असल्याने त्यांनी ज्ञानघन प्रज्वलित केला की महादिपाप्रमाणे उजेड पडतो. ह्या महादीपाची प्रभा कायम टिकणारी असते. प्रपंचातून सुख मिळेल आणि ते कायम टिकणारे असेल ह्या आशेने मनुष्य मोठ्या उत्साहाने प्रपंच करत असतो पण प्रपंचातील सुख कायम टिकणारे नाही एव्हढेच नव्हे तर ते शेवटी दु:खच देते हे लक्षात आल्यावर मनुष्य निराश होतो आणि प्रपंचातून सुख मिळवण्याच्या ओढीने तो करत असलेल्या खटपटी पूर्णपणे थांबवतो. अधिकाची अपेक्षा न करता जे आहे त्यात सुखीसमाधानी राहतो. ह्यालाच वैराग्य म्हणतात. ह्या वैराग्यामुळेच उपदेश करणाऱ्यावर त्याची पूर्ण श्रद्धा बसते. त्यामुळे त्याच्या उपदेशापासून त्याच्या अंत:करणात तो वैशिष्ट्यापूर्ण ज्ञानदीप प्रज्वलित होतो. अमुक एक करून सुख मिळेल असे अशाळभूतपणे मन सदैव म्हणत असते परंतु ज्ञानदिपाच्या प्रभेमुळे आशेचा गडद पडलेला अंधार नाहीसा होतो. तसेच ह्या ज्ञानदीपाने अज्ञानरुपी अंधारही नाहीसा होतो. अशा ज्ञानदिपाचा प्रकाश चहूकडे पडतो आणि त्यात तुझे अस्तित्व उघडपणे जाणवते. हृषीकेशी असे उघडपणे जाणवणारे निजरूप तू मला अनायासे दाखवलेस. तुझे अंतर्यामी स्वरूप तू मला ह्यापूर्वीच अर्पण केले आहेस. त्यामुळेच तुझे भजन करण्याची प्रेरणा मला मिळाली. तुझे भजन करणे म्हणजे सर्वभूती तुझे अस्तित्व हे मान्य करून सर्वांना साष्टांग नमन करणे. ह्यालाच तू चौथी भक्ती म्हणतोस. ती केल्याने तुला अतिशय आनंद होऊन तुझे गुह्य ज्ञान तू भजन करणाऱ्याला अर्पण करतोस. अशा पद्धतीने तुझे भजन वाढवायला लाऊन जे ज्ञान मुळातच माझ्याकडे आत्मरुपात आहे तेच तू मला पुन्हा अर्पण केलेस ह्याला साधू आणि सज्ञान लोक ‘प्रत्यर्पण’ असे म्हणतात. आत्तापर्यंत मी मायेने वेढला गेलेलो असल्याने माझ्या आत्मरूपाचे ज्ञान मला नव्हते परंतु तुझी भक्ती वाढवायला लावलीस. त्यामुळे माझ्याभोवती असलेले मायेचे पटल दूर झाले. आता माझ्या आत्मस्वरुपाविषयी कोणताही अन्य विचार मला स्पर्शसुद्धा करू शकत नाही.

Advertisement

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article