Satara : बलात्काराचा गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेविरुद्ध खंडणीचा गुन्हा
वाईत हॉटेलमध्ये लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार
सातारा : वाई शहरातील एका हॉटेलमध्ये लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा वैभव धायगुडे (वय ३२, रा. अहिरे) याच्यावर दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ज्या महिलेने हा गुन्हा दाखल केला आहे, त्याच महिलेवर खंडाळा पोलीस ठाण्यात त्याच महिलेच्या विरोधात खंडणीची मागणी, घरात शिरुन मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार वाई येथील पाचगणी रोडवरील एका हॉटेलमध्ये ३० सप्टेंबरच्या दुपारी दीड ते १ ऑ क्टोबरच्या दुपारी २ वाजेच्या दरम्यान तिला लग्नाचे अमिष दाखवून वैभव धायगुडे (रा. अहिरे) याने दोन वेळा शारीरिक संबंध ठेवले. त्यावरुन वाई पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वाईचे डीवायएसपी सुनील साळुंखे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. याचा तपास पीएसआय सुधीर वाळूज करत आहेत.
दरम्यान, वैभव धायगुडे याने खंडाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ४० वर्षीय महिलेने १९ रोजी दुपारी १२ वाजता घरात शिरुन पैशाची मागणी केली. त्यावर वैभव याने काम सोडले आहे. पैसे देणार नाही, असे सांगितले. यावर त्या महिलेने पाणी पिण्यासाठी दिलेला तांब्या घरातील टिव्हीवर फेकून मारला. घरातील साहित्याची तोडफोड केली. तसेच वैभव धायगुडे याचे गचांडे पकडले. यावेळी त्याचे वडील सोडविण्यासाठी आले असता तिने त्यांना ढकलून देत शिवीगाळ करत तू मला पैसे नाही दिले तर मी तुझ्यावर बलात्काराची केस दाखल करेन, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार एन. बी. धायगुडे हे तपास करत आहेत.