विदेशमंत्री एस जयशंकर पाकिस्तानला भेट देणार
एससीओ’ परिषदेचे निमित्त : 10 वर्षांपूर्वी सुषमा स्वराज यांनी केला होता शेजारी देशाचा दौरा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) बैठकीत भारत सहभागी होणार असून विदेश व्यवहारमंत्री एस. जयशंकर यासाठी पाकिस्तानला जाणार आहेत. एससीओ परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व परराष्ट्रमंत्री एस जयशंकर करणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केले. 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये ही बैठक होणार आहे.
पाकिस्तानमधील एससीओच्या बैठकीत भारताने सहभागी व्हावे की नाही, याबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. आता अखेर भारताने त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या परिषदेच्या निमित्ताने तब्बल 10 वर्षानंतर भारतीय नेता पाकिस्तानला भेट देणार आहे. परराष्ट्रमंत्री म्हणून एस जयशंकर पहिल्यांदाच इस्लामाबादला जाणार आहेत. यापूर्वी 10 वर्षांआधी 2015 मध्ये परराष्ट्रमंत्री म्हणून दिवंगत सुषमा स्वराज ‘हार्ट ऑफ एशिया’ परिषदेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला गेल्या होत्या. त्यांच्यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 2016 मध्ये सार्क देशांच्या गृहमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला भेट दिली होती.
पाकिस्तानला आरसा दाखवणार
एस जयशंकर यांच्या या भेटीमुळे पाकिस्तानला जागतिक पटलावर एकाकी पडल्याचे दाखवण्यात भारताला पुन्हा एकदा यश येणार आहे. त्यानंतर पाकिस्तान जोपर्यंत आपल्या भूमीतून दहशतवादाला चालना देणे थांबवत नाही तोपर्यंत त्याच्याशी कोणतीही चर्चा शक्मय नाही, असा संदेश देण्यात सक्षम होईल. भारत हा संदेश थेट पाकिस्तानातून देणार असल्याने तो खूप प्रभावी ठरेल, असा दावा केला जात आहे.
गेल्या 9-10 वर्षांत भारताने पाकिस्तानशी प्रत्येक स्तरावर संबंध तोडले आहेत. जोपर्यंत पाकिस्तानच्या भूमीतून भारतात दहशतवादी कारवाया सुरू आहेत, तोपर्यंत शेजारी देशाशी कोणतीही चर्चा करणार नाही, असे सध्या भारताचे अधिकृत धोरण आहे. भारत अजूनही या धोरणावर ठाम असल्यामुळे सर्व आंतरराष्ट्रीय आणि द्विपक्षीय मंचांवर दोन्ही देशांमध्ये कोणतीही चर्चा होत नाही. या धोरणानंतर भारताने प्रत्येक स्तरावर पाकिस्तानशी द्विपक्षीय संबंधांपासून अंतर राखले आहे.
पाकिस्तानशी चर्चा होणार का?
एस जयशंकर यांच्या दौऱ्यात पाकिस्तानसोबत कोणतीही द्विपक्षीय चर्चा होणार नसल्याचे भारत सरकारने स्पष्ट केले आहे. भारत एससीओला महत्त्व देतो. या कारणास्तव एस. जयशंकर या बैठकीत भारताचे प्रतिनिधी म्हणून सहभागी होणार आहेत. पाकिस्तानसोबतच्या खराब संबंधांमुळे भारताने एससीओच्या बैठकीपासून दूर राहू नये, असेही तज्ञांचे म्हणणे आहे. गेल्यावषी या संघटनेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो भारतात आले होते. मात्र भारत सरकारने त्यांच्याशी कोणतीही द्विपक्षीय चर्चा केली नव्हती.