solapur : लाचखोरीत रंगेहात पकडलेले विस्तार अधिकारी संदीप खरबस अखेर निलंबित!
दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे लाचखोर विस्तार अधिकारी खरबस निलंबित
सोलापूर : दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीप खरबस यांना मंजूर कामाचे बिल काढण्यासाठी दोन हजार रूपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी त्यांना सेवेतून निलंबित केले आहे.
३० ऑक्टोबर रोजी लाचखोरीची कारवाई झाल्यानंतर खरबस यांना जिल्हा परिषदेकडून निलंबित करण्यात आले नव्हते. कारवाईनंतरही खरबस पंचायत समिती कार्यालयात कामकाज असल्याची तक्रार करण्यात आली होती. याप्रकरणी सीईओ जंगम यांनी तातडीने तक्रारीची दखल घेत खरबस यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबित काळात खरबस यांना पंढरपूर पंचायत समिती कार्यालयात हजर करीत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
संदीपखरबस यांनी दक्षिण सोलापूर पंचायत समितीत विस्तार अधिकारी पदाचा पदभार घेतल्यापासून अनेक ग्रामपंचायत अधिकारी व सरपंचांनी वरिष्ठांकडे तक्रार केली होती. मात्र या तक्रारीकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्यामुळे मंजूर कामाचे बिल काढण्यासाठी दोन हजार रूपये लाच घेताना खरबस यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.