बेंगळूर-धारवाड एक्स्प्रेसचा बेळगावपर्यंत विस्तार गरजेचा
खासदार शेट्टर यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी
बेळगाव : बेंगळूर-धारवाड वंदे भारत एक्स्प्रेसचा विस्तार बेळगावपर्यंत करावा, या मागणीसाठी खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे भेट घेतली. बेंगळूर वंदे भारत एक्स्प्रेसची बेळगावला का गरज आहे? याबाबत त्यांनी रेल्वे मंत्र्यांना माहिती दिली. नुकत्याच सुरू झालेल्या पुणे-बेळगाव-हुबळी या वंदे भारत एक्स्प्रेस व बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील रेणुका यल्लम्मा मंदिरासाठी नवीन रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे निर्देश दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. बेंगळूर-बेळगाव वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यास उद्योग, व्यापार क्षेत्रालाही चालना मिळणार असल्याने रेल्वेमंत्र्यांनी तात्काळ याची दखल घेत नागरिकांची मागणी पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी केले. खासदार शेट्टर यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांचीही भेट घेऊन बेळगावच्या प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी रेल्वे बोर्डचे अधिकारी उपस्थित होते.