पाकिस्तानात सैन्यप्रमुखांच्या कार्यकाळात वाढ
3 नव्हे 5 वर्षांचा कार्यकाळ : शाहबाज सरकारने सैन्यप्रमुखांना केले खूश
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानात सैन्यप्रमुखांचा कार्यकाळ आता 3 वर्षे नव्हे तर 5 वर्षे करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या सरकारने कायद्यात यासंबंधी दुरुस्ती केली आहे. याचबरोबर वर्तमान सैन्यप्रमुख आसिम मुनीर देखील आता 2027 पर्यंत पदावर राहणार आहेत. यापूर्वी त्यांचा कार्यकाळ 2025 मध्ये संपुष्टात येणार होता.
सैन्यप्रमुखांसोबत पाकिस्तानी सैन्याच्या अन्य वरिष्ठ कमांडर्सचा कार्यकाळही वाढविण्यात आला आहे. संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी पाकिस्तान आर्मी अॅक्ट 1952 मध्ये दुरुस्तीचा प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव सभागृहाचे अध्यक्ष अयाज सादिक यांनी संमत झाल्याची घोषणा केली आहे.
सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना खूश करण्याकरता शाहबाज शरीफ सरकारने हे पाऊल उचलल्याचे मानले जत आहे. सिनेटमध्ये हा दुरुस्ती प्रस्ताव संमत करण्यासाठी केवळ 16 मिनिटांचा कालावधी लागला आहे.
कायदा देशाच्या हिताचा नाहही
सैन्यप्रमुखांचा वाढलेला कार्यकाळ हा माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पक्षासाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. इम्रान हे सत्तेवरून हटविण्यामागे सैन्यच असल्याचा आरोप करत असतात. तसेच इम्रान यांनी सैन्यप्रमुख आसिम मुनीर यांच्या विरोधात कारवाईची मागणीही केली आहे. कुठल्याही चर्चेशिवाय संसदेत अशाप्रकारचा प्रस्ताव संमत करणे गैर आहे. हा प्रकार देश आणि सैन्य दोघांसाठी चांगला नसल्याची टीका इम्रान यांच्या पीटीआय या पक्षाचे खासदार उमर अयूब यांनी केली आहे.
पाकिस्तानात जंगलराज : इम्रान
इम्रान खान यांच्या पक्षाने फेब्रुवारीमध्ये झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या, परंतु पक्षाला बहुमत मिळविता आले नव्हते. इम्रान यांच्या पक्षाचे नेते फवाद चौधरी यांनी काही महिन्यांपूर्वी सैन्याशी तह केल्यास इम्रान पंतप्रधान होऊ शकतात असे वक्तव्य केले होते. पाकिस्तानात जंगलराज सुरू आहे. या जंगलराजचे राजा सैन्यप्रमुख आसिम मुनीर आहेत. पाकिस्तानात मुनीर यांच्या मर्जीनुसारच सर्वकाही घडत असल्याचा आरोप इम्रान यांनी केला होता.