गॅरंटी योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा
जिल्हास्तरीय गॅरंटी योजना प्रगती आढावा बैठकीत सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
राज्यातील गोरगरीब आणि मध्यमवर्गीयांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी राज्य सरकारने पाच गॅरंटी योजना लागू केल्या आहेत. प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत या योजनेची सुविधा पोहोचवावी, अशी सूचना बेळगाव जिल्हास्तरीय गॅरंटी समितीचे अध्यक्ष विनय नावलगट्टी यांनी केली आहे.
जिल्हा पंचायत सभागृहात शुक्रवारी जिल्हास्तरीय गॅरंटी योजना प्रगती आढावा बैठक झाली. यावेळी अध्यक्षस्थानावरून गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीबाबत सूचना केल्या.
पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवा
जिल्ह्यात गॅरंटी योजना समर्पकपणे राबवून सर्वसामान्यांमधील संभ्रम दूर केला पाहिजे. याबाबत अधिकाऱ्यांनी जनतेशी नम्रपणे चर्चा करून योजनांमधील त्रुटी दूर कराव्यात आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवाव्यात, अशा सूचना करण्यात आल्या. अन्नभाग्य योजनेंतर्गत जुलै 2023 ते जुलै 2024 दरम्यान 35 लाख 21 हजार 586 लाभार्थ्यांना तांदळाच्या बदल्यात डीबीटीद्वारे निधी देण्यात आला आहे. गृहज्योती योजनेंतर्गत 10 लाख 28 हजार 436 ग्राहकांनी नोंद केली आहे. तर सप्टेंबर 2024 पर्यंत गृहलक्ष्मी योजनेंतर्गत 10 लाख 76 हजार 524 लाभार्थ्यांनी नोंद केली आहे. शिवाय 2266.40 कोटी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. शक्ती योजनेंतर्गत जून 2023 ते सप्टेंबर 2024 पर्यंत 23.8 कोटी महिला प्रवाशांनी मोफत प्रवास केला आहे. युवानिधी योजनेंतर्गत 28 हजार बेरोजगार तरुणांना 8 कोटी 36 लाख 67 हजार रुपये जमा करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
याप्रसंगी जि. पं. सीईओ राहुल शिंदे, उपाध्यक्ष मल्लाप्पा मुरगोंड, शेखर इट्टी, रुद्रय्या हिरेमठ, सदस्य सूर्यकांत कुलकर्णी, शिवकुमार राठोड यासह पदाधिकारी उपस्थित होते.