अभिव्यक्ती...
एका गावात दोन मित्र राहत होते. राम आणि शाम. छोटेसेच, लहानपणापासूनचे मित्र. दोघांची मैत्री मात्र अगदी घट्ट असायची. शाळेत जाताना, घरी काय काय झालं, याची दोघेही एकमेकांशी गप्पा मारताना चर्चा करायचे आणि शाळा सुटली की शाळेतून येताना आता घरी गेल्यावर काय काय खेळायचं? काय काय मज्जा करायची, याविषयी दोघांची चर्चा सुरू व्हायची. दोघांचेही विचार आपापल्या जागी ठाम असायचे. त्यांना जे वाटायचं ते, ते बोलून दाखवायचे. त्यांची अभिव्यक्ती त्या नुसार अगदी बघण्यासारखी होती. असंच एकदा शाळेतून येताना एक दिवस दोघेजण मात्र अगदी गप्प गप्प होते. कारण विषयच तसा झाला होता. शाळेत चित्रकलेच्या बाईंनी त्यांना जंगलाविषयी चित्र काढायला सांगितलं होतं. मुलांनी अगदी सरसावून चित्र काढायला सुरुवात केली होती. पण ह्या दोघांनी जे चित्र काढलं होतं ते मात्र चित्रकलेच्या बाईंना अजिबात आवडलं नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं चित्र हे वर्गात सगळ्यांना दाखवलं. खरं म्हणजे ते दाखवताना त्यांनी काढलेल्या चित्राचा वेगळेपणा त्यांनी इतर मुलांना सांगायला हवा होता. परंतु तसं न करता इतर मुलांसारखं सरधोपट चित्र काढलं नाही म्हणून त्यांना त्या खूप रागावल्या. या गोष्टीचं त्यांना अतिशय वाईट वाटलं. आता काय करायचं? हे चित्र फाडून टाकायचं? किंवा या चित्राच्या घड्या करून होडी बनवून पाण्यात सोडून द्यायचं? असे अनेक विचार त्यांच्या मनात येऊ लागले. शेवटी त्यांनी आता काहीच विचार करायला नको म्हणून चित्राची घडी करून आपापल्या दप्तरांमध्ये ठेवून दिलं. घरी गेल्यानंतर आई-बाबा नेमकं आता काय म्हणतील याचा विचार आता त्यांच्या मनात घोळू लागला. परंतु घरी गेल्यानंतर मित्र खेळायला आले आणि ही मुलं हे सगळं विषय विसरूनच गेले. खेळून आले, अभ्यास झाला आणि जेवण झाल्यानंतर झोपायला गेल्यानंतर आईने नेहमीप्रमाणे दप्तर तपासायला घेतलं. दोघांच्या आयांनी दोन्ही मुलांची चित्रं पाहिली आणि त्या विचार करू लागल्या. मुलांशी बोलल्यानंतर कळलं की त्यांना जंगल या विषयावर चित्र काढायला सांगितलं. परंतु ह्या मुलांनी वेगळे चित्र काढल्यामुळे त्यांना अजिबात मार्क्स मिळाले नव्हते. आता आईने मुलांशी बोलायला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या मनात असलेली जंगलाची कल्पना त्या चित्रामध्ये साकारली होती. रामने माणसांचे जंगल, इमारतींचे जंगल, इमारतींवरून टाकलेल्या केबलचे जंगल....अशा कितीतरी गोष्टींची विविधता आणून ते चित्र रेखाटण्याचा प्रयत्न केला होता. इकडे शामने मात्र वेगळंच जंगल उभं केलं होतं. प्रचंड केसाळ अशा माणसाचं, की ज्याच्या हातावर, पाठीवर, पोटावर प्रचंड केस आहेत अशा त्याच्या बाबांचे चित्र, त्यांनी काढलं होतं. कारण त्यांनी अनेकदा बाबा झोपल्यानंतर त्यांच्या केसातून फिरणाऱ्या मुंग्या, चिलटं, माशा लांबून बघितल्या होत्या. तेच त्याने चित्रात रेखाटलं होतं. खरं म्हणजे मुलांचे विश्व हे वेगळ्या अभिव्यक्तीचं असतं आणि त्याचं आपण स्वागत, स्विकार करायचं असतं. हेच जेव्हा शिक्षक विसरतात तेव्हा असे प्रसंग घडतात. आईने मात्र दोघांनाही जवळ घेतलं आणि त्यांनी काढलेल्या वेगळ्या चित्राचं कौतुक केलं आणि पाठीवर थोपटत म्हणाली, विचारांच्या जंगलात तुम्ही हरवला नाहीत याचं मला फार मोठे कौतुक वाटते. कारण आजकाल काहीतरी वाचायचं, काहीतरी बघायचं आणि त्याच्यातच वाहून जाऊन तेच आपण केल्याने सगळ्यांसारखे दाखवण्याचा प्रयत्न करायचा, हे तुम्ही न करता तुमच्या विचारांशी तुम्ही ठाम आहात याचा मला जास्त कौतुक वाटतं. असं म्हणून जेव्हा आईने त्यांना जवळ घेतलं तेव्हा त्या मुलांना आपण उत्तम चित्र काढले याची खऱ्या अर्थाने पावती मिळाली.