रेल्वेगेटवर विद्यार्थी-पालकांची ‘शाळा’
पहिल्या-दुसऱ्या रेल्वेगेटवर एक्स्प्रेस थांबून राहिल्याने सर्वांचीच कसरत : उपाययोजना करणे गरजेचे
बेळगाव : हुबळीहून बेळगावला येणाऱ्या रेल्वे टिळकवाडी येथील पहिले-दुसरे रेल्वेगेट परिसरात थांबत आहेत. बराच वेळ होऊनही रेल्वे पुढे सरकत नसल्याने अखेर शालेय विद्यार्थी, त्यांचे पालक रेल्वेच्या आतून चढून पुन्हा उतरण्याची जीवघेणी कसरत करीत आहेत. त्यामुळे मोठा धोका होण्याची शक्यता असून रेल्वेने या समस्येवर कायमस्वरुपी उपाय करणे गरजेचे आहे.
रेल्वे आल्यानंतर जोवर रेल्वेस्टेशनमधून सिग्नल दिला जात नाही, तोवर ती रेल्वे टिळकवाडी परिसरात थांबविली जाते. शुक्रवारी सकाळच्या सुमारास अशीच घटना घडली. टिळकवाडी परिसरात अनेक शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांची ये-जा सुरू असते. बराच वेळ एक्स्प्रेस जाग्यावरच थांबल्याने विद्यार्थी व त्यांचे पालक रेल्वेमध्ये एका बाजूने चढून दुसऱ्या बाजूने उतरत होते. परंतु, या दरम्यान रेल्वे सुरू झाल्यास मोठा धोका निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
काही लहान विद्यार्थी तर रेल्वेखालून येण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे निष्पापाचा बळी जाण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने यावर कायमस्वरुपी तोडगा काढणे गरजेचे आहे. अनेकवेळा एक्स्प्रेस टिळकवाडी परिसरात येऊन थांबत असल्याने नागरिकांचीही गैरसोय होत आहे. अर्धा ते पाऊण तास काहीवेळा एक्स्प्रेस थांबल्याने प्रवाशांना गोगटे सर्कल अथवा तिसरे रेल्वेगेट मार्गे वळसा घालून प्रवास करावा लागत असल्याने रेल्वे प्रशासनाने याचा विचार करण्याची गरज आहे.
जीव धोक्यात घालून प्रवास नको
एक्स्प्रेस काहीकाळ थांबल्यास शालेय विद्यार्थी व त्यांचे पालक रेल्वेमध्ये चढून दुसऱ्या दिशेने उतरत असतात. परंतु, हा प्रवास जीवघेणा ठरू शकतो. एक्स्प्रेस सुरू झाल्यास मोठा अपघात होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे काहीकाळ थांबून प्रवास करणे योग्य ठरणार आहे. त्यामुळे असा जीवघेणा प्रवास करण्यापूर्वी थोडासा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.