आपल्याच देशाचा पर्दाफाश...
पाकिस्तान हा देश साऱ्या जगात ‘दहशतवाद्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी’ म्हणून ओळखला जात आहे. या कारणामुळे त्या देशाची मोठी बदनामीही होते. पण तो दहशतवाद्यांची पाठराखण करण्याचे काम कधी सोडत नाही. पाकिस्तानी दहशतवादी भारतासारख्या देशांमध्ये तर धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न करतातच, पण प्रत्येक पाकिस्तानातही त्यांचेच राज्य चालते. कधी कोणत्या ठिकाणी बाँबचा धमाका होईल आणि पाच-पन्नास माणसे मरतील याचा नेम नसतो.
अशा पाकिस्तानमधील कराची हे मोठे आणि झगमगते शहर आहे. त्याला ‘प्रकाशाचे शहर’ म्हणूनही ओळखले जाते. याच कराची शहरातील काही युवतींनी आपल्या देशाच्या कृष्णकृत्यांचा पर्दाफाश करणारा व्हिडीओ इंटरनेटवर प्रसिद्ध केल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे. श्रीमंतीचा दिखावू भपका मिरविणारे हे शहर प्रत्यक्षात सर्वसामान्य नागरीकांसाठी कसे आहे, हे या व्हिडीओतून स्पष्ट होते.
अलिशा अन्वर या महिलेने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात या शहरातील अनेक लोकांनी आपल्या शहरासंबंधीचे अनुभव कथन केलेले दिसतात. कराचीला प्रकाशाचे शहर म्हणतात, पण येथे वीजेचा अत्यंत तुटवडा आहे. सर्वसामान्यांना अनेक तास वीज मिळत नाही. एक मोठा पाऊस पडला, तरी सारे शहर पाण्याखाली जाते. या शहरात नळाद्वारे गॅसचा पुरवठा होतो पण रात्री 10 नंतर गॅस मिळत नाही. मोबाईल नेटवर्क सतत बंद पडते. येथे केव्हा बाँबचा स्फोट होईल सांगता येत नाही. सर्वसामान्यांना एकवेळ अन्न मिळणार नाही, पण अवैध शस्त्रांचा आणि स्फोटकांचा सुळसुळाट मात्र आहे, असे अनेक अनुभव या शहरातील महिलाच व्यक्त करताना या व्हिडीओत दिसून येतात. 75 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. त्यांच्यात मोठ्या प्रमाणात भारतीयही आहेत. भारतीय नागरीकांनी या व्हिडीओच्या संदर्भात त्यांची मतेही व्यक्त केली आहेत. एकंदर, दिसते तसे नसते, याचे उदाहरण म्हणजे हे शहर आहे.